‘वसंतदादा’मध्ये सौदे ठप्प, फळ मार्केट शंभर टक्के बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

सांगली - येथील वसंतदादा मार्केट यार्डात अडत वसुली खरेदीदारांवर निश्‍चित केल्याच्या निषेधार्थ आज सौदे बंद राहिले. विष्णुअण्णा फळे-भाजीपाला मार्केटमध्ये व्यापारी, हमाल व माथाडी कामगारांनी नियमनमुक्तीविरोधात बेमुदत बंद पुकारला. परिणामी लाखोची उलाढाल ठप्प राहिली. त्याचा फटका भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना बसला.

आतापर्यंत शेतकऱ्यांकडून आकारली जाणार अडत ही खरेदीदारांकडून घेण्याचा निर्णय झाला. त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. अधिकृतपणे आंदोलन न करता मागच्या दाराने निषेध नोंदवला आहे. खरेदीदारांनी आज सौद्याला उपस्थित न राहून निषेध केला. आंदोलनाची माहिती सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आली नाही, असे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी खरेदीदारांकडे चौकशी केली. त्यावर आज खरेदीच नाही, असे सांगण्यात आले. आजच्या सौद्याला २ हजार पोती हळद, १० हजार गूळ रवे अशी आवक होती. त्याचा सौदा ठप्प राहिला.

विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. सरकारने बाजार समितीतून फळे, भाजीपाला नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतलाय. निर्णयाची अंमलबजाणी सुरू आहे. त्याचा निषेध नोंदवताना व्यापाऱ्यांसाठीही सवलती द्या, अशी मागणी करण्यात आली. दोन-तीन दिवसांपासून बाजार समिती आवारात शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीत शेतीमाल आणला नाही. काही शेतकरी शेतीमाल घेऊन आले. व्यापारी, हमाल व माथाडी बंदमध्ये सहभागी झाल्याने विक्री झाली नाही. शेतकऱ्यांना माल परत न्यावा लागला.