वसंतदादा कारखान्याची चौकशी करा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

सांगली - वसंतदादा सहकारी साखर कारखान्यात सर्वच व्यवहारांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, गैरव्यवहार व अनियमितता दिसून येते. त्यामुळे लेखापरीक्षकांनी संबंधित सर्व मुद्द्यांचा चौकशीमध्ये समावेश करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने सहकार, पणन, वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे.

सांगली - वसंतदादा सहकारी साखर कारखान्यात सर्वच व्यवहारांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, गैरव्यवहार व अनियमितता दिसून येते. त्यामुळे लेखापरीक्षकांनी संबंधित सर्व मुद्द्यांचा चौकशीमध्ये समावेश करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने सहकार, पणन, वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे.

मंत्री देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, प्रादेशिक सहसंचालक साखर, कोल्हापूर यांनी  कलम ८८ नुसार वसंतदादा साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी लेखापरीक्षक श्री. वाघ यांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी त्यांनी चौकशीचे मुद्दे निश्‍चित केले आहेत.  मात्र त्या व्यतिरिक्त इतर अनेक व्यवहारांत प्रचंड  भ्रष्टाचार झाला आहे.

कारखान्यातील साखर विक्री, स्क्रॅप विक्री, साहित्य खरेदी, जमीन विक्री, मशिनरी नूतनीकरण व दुरुस्ती, कामगारांना बेकायदेशीर ले-ऑफ, कायमस्वरूपी  कामगार असताना रोजंदारीवर नवीन कामगार घेणे, ऊसबिलापोटी शेतकऱ्यांना धनादेश देणे व न वठवणे, कामगारांच्या पगारातून विविध कपाती करून संबंधित विभागाकडे वर्ग न करणे, साखर कामगार पतसंस्था व साखर कामगार सेवक पतसंस्था, महत्त्वाची कागदपत्रे गहाळ करणे, नष्ट करणे या सर्व व्यवहारात भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि अनियमितता आहे. यासंदर्भात कारखान्याच्या लेखापरीक्षण अहवालात ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे सर्व मुद्द्यांचा चौकशीमध्ये समावेश करण्यात यावा. तसेच संबंधितांवर कारवाई करावी, असेही म्हटले आहे. निवेदनावर राज्य प्रचारप्रमुख संजय कोले, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे, वसंतराव सुतार, मोहन परमणे, रावसाहेब दळवी, बाळासाहेब पाटील, चंद्रकांत सोनवले, शीतल राजोबा, एकनाथ कापसे, शंकर कापसे, सुहास गाडवे यांच्या  सह्या आहेत. निवेदन आमदार सुधीर गाडगीळ  यांच्याहस्ते सहकारमंत्री देशमुख तसेच प्रादेशिक सहसंचालक साखर, साखर आयुक्त पुणे यांना पाठवले आहे.