पीडित मुलगी घटनेपूर्वी दोन दिवस गैरहजर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

नगर - कोपर्डी येथील अत्याचार व खुनाच्या घटनेपूर्वी पीडित मुलगी दोन दिवस शाळेत गैरहजर होती, अशी साक्ष आज कुळधरण येथील नूतन विद्यालयातील तिच्या वर्गशिक्षकाने न्यायालयात दिली. 

नगर - कोपर्डी येथील अत्याचार व खुनाच्या घटनेपूर्वी पीडित मुलगी दोन दिवस शाळेत गैरहजर होती, अशी साक्ष आज कुळधरण येथील नूतन विद्यालयातील तिच्या वर्गशिक्षकाने न्यायालयात दिली. 

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची नियमित सुनावणी विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सुरू आहे. आरोपीच्या वकिलांच्या मागणीप्रमाणे आज कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याने रुग्णालयातील नोंदवह्या न्यायालयासमोर सादर केल्या. आरोपीच्या वकिलांनी त्यांची उलटतपासणी घेतली. त्यात आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभागाच्या नोंदवह्यांमध्ये खाडाखोड असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. त्यावर विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाकडे फेरतपासणीसाठी अर्ज केला. वैद्यकीय अधिकारी म्हणाले, "लिपिक व कर्मचारी वह्यांमध्ये नोंदणी करतात. ही त्यांच्याकडून चूक झाली असावी.' 

नंतर कुळधरण येथील नूतन विद्यालयातील पीडित मुलीच्या वर्गशिक्षकाची ऍड. निकम यांनी सरतपासणी घेतली. त्या वेळी शिक्षक म्हणाले, "पीडित मुलगी अत्यंत हुशार व गुणी होती. खो-खो व नृत्यात ती पारंगत होती. मात्र, 12 व 13 जुलैला ती शाळेत आली नव्हती.' या वेळी शिक्षकाने विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रकही न्यायालयासमोर सादर केले. आरोपींच्या वकिलांनीही शिक्षकाची उलटपासणी घेतली. 

निकम यांनी एका प्रत्यक्षदर्शीची सरतपासणी घेतली. त्यात तो म्हणाला, ""फिर्यादी, एका मित्रासह आम्ही 13 जुलै 2016 रोजी सायंकाळी कोपर्डीकडे जात होतो. त्या वेळी पीडित मुलीची आई व बहीण रस्त्याने जाताना दिसली. त्यांनी फिर्यादीला "पीडित मुलगी मसाला आणण्यासाठी आजोबांकडे गेली होती. तुम्हाला दिसली का? दिसल्यास तिला घरी पाठवून द्या' असे सांगितले. थोडेसे पुढे गेल्यानंतर पीडित मुलीची सायकल रस्त्यालगत दिसली. जवळच्या झाडाखाली पप्पू शिंदे उभा होता. झाडाकडे गेलो असता, पीडित मुलगी जखमी अवस्थेत पडलेली होती.'' आरोपीला साक्षीदाराने न्यायालयात ओळखले. त्याचे कपडेही ओळखले. आरोपींतर्फे विधी न्याय प्राधिकरणचे ऍड. योहान मकासरे, ऍड. बाळासाहेब खोपडे, ऍड. प्रकाश आहिरे यांनी उलटतपासणी घेतली. 

पुरावा आज सादर करणार 
पीडित मुलगी घटनेपूर्वी दोन दिवस शाळेत गैरहजर असल्याची साक्ष तिच्या वर्गशिक्षकाने दिली आहे. मात्र, पीडित मुलगी शाळेत का गैरहजर होती, याचा पुरावा उद्या (मंगळवारी) न्यायालयात सादर करू, असे ऍड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले.