ऐन दिवाळीत मतदारांना लक्ष्मी दर्शनाचा योग

ऐन दिवाळीत मतदारांना लक्ष्मी दर्शनाचा योग

सांगली - सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेचा दोन्ही कॉंग्रेसमधील लढत जवळपास फायनल झाली आहे.

कॉंग्रेसकडून मोहनराव कदम, तर राष्ट्रवादीकडून शेखर गोरे यांच्या नावाचे एबी फॉर्म प्रदेशाध्यक्षांकडून देण्यात आले आहेत. अर्ज दाखल करण्याची उद्या अखेरचा दिवस तर अर्ज माघारीची मुदत शुक्रवारपर्यंत असेल. या लढतीत सांगली महापालिकेतील उपमहापौर गटाचे शेखर माने यांनी उडी घेतल्याने या निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच पंधरा दिवस आधी उमेदवारांनी मतदारांसाठी पेटारे उघडले आहेत. ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनादिवशीच अनेकांना लक्ष्मी दर्शन झाले.

मर्यादित मतदारसंख्येत होणारी ही निवडणूक आजवर पक्षीय पातळीवर कधी झालीच नाही. दोन्ही जिल्ह्यांवर कॉंग्रेसचे आणि नंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर दोन्ही कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले. या चित्रात भाजप-सेनेला फारसा वाव कधी मिळालाच नाही. दोन्ही कॉंग्रेस श्रेष्ठींचे वरती जुळले की निवडणूक बिनविरोध व्हायची. यावेळी मोहनराव कदम यांनी चार महिने आधीच पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत कडेगावला मेळावा घेऊन आपल्या उमेदवारी न बोलता घोषणा केली. तेव्हापासूनच ही निवडणूक चुरशीची होणार याची चिन्हे दिसू लागली. कारण राष्ट्रवादी ही जागा कॉंग्रेसला सोडायची शक्‍यता अशक्‍य कोटीतील होती. श्री. कदम यांनी परस्पर अर्ज भरल्यानंतर तिकडे शेखर गोरे यांची उमेदवारीही जाहीर झाली. या दोघांची उमेदवारी म्हणजे मतदारांसाठी चंगळच असा एकूण सर्वांचा सूर होता. मात्र त्यात खरा रंग भरला तो शेखर माने यांनी अर्ज दाखल केल्यामुळेच. तब्बल 38 मतदारांसह माने यांनी अर्ज दाखल केला आणि गेल्या दोन-तीन दिवसांत मोठी खळबळ माजली. ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनालाच अनेक मतदारांना लक्ष्मी दर्शनाचा लाभ झाला. मतदानाला अजून..दिवसांचा अवधी असताना आधीच जुळून आलेल्या या लक्ष्मीयोगाची कारणमीमांसा सर्वच मतदारांकडून सुरू झाली आहे. राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेतील तर कॉंग्रेसकडून एका वरिष्ठ नगरसेवकांच्या माध्यमातून मतदारांना लाभाचा पहिला हप्ता पोहोच झाला आहे. अशी पर्वणी पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आल्याचा आनंद एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांने खासगीत व्यक्त केला. दरम्यान, दोन दिवसांपासून मतदारांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. शब्द घेऊन शब्द दिला जात आहे. उमेदवारांनी मतदारांच्या समर्थक नेत्यांपर्यंत म्हणजे दोन्ही जिल्ह्यांतील आमदार, खासदार, तालुका पातळीवरील नेत्यांशी संपर्क साधला आहे. त्यातून गोळाबेरीज करून समीकरणे जुळवण्यावर उमेदवारांचा भर राहील.

आकडे मतदारसंख्येचे
सांगली जिल्हा महापालिकेतील नगरसेवक-81 (एकूण 84 नगरेसवक आहेत. त्यातले सुरेश आवटी, मैन्नुद्दीन बागवान, नाझिया नायकवडी असे तीन नगरसेवक अपात्र आहेत. त्यांच्याबाबतच्या सुनावणीच्या निकालाची प्रतीक्षा आहे.)
सांगलीतील नगरपालिका ः तासगाव-21, विटा-25, इस्लामपूर-28, आष्टा-21, जत 20

सातारामधील नगरसेवक मतदार - वाई-20, महाबळेश्‍वर-11 (एकूण 19 पैकी आठ नगरसेवक अपात्र), पाचगणी-17, लोणंद-18, फलटण-28, म्हसवड-19, रहिमतपूर-19, कऱ्हाड-32, मलकापूर-19, सातारा-43
सांगली जिल्हा परिषद 62, पंचायत समिती सभापती -8 (तासगाव आणि जतच्या सभापती यांना मतदान करता येणार नाही), एकूण-70
सातारा जिल्हा परिषद- 67, पंचायत समिती सभापती-11 एकूण- 78
पुरुष मतदार-286, स्त्री मतदार 284, एकूण मतदान-570

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com