सांगली- साताऱ्यात राष्ट्रवादीला हादरा

vidhan parishad satara sangli
vidhan parishad satara sangli

कॉंग्रेसचे मोहनराव कदम यांचा विजय; शेखर गोरे पराभूत
सांगली - राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली- सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांनी 63 मतांनी धक्‍कादायक विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीकडे अनेक वर्षे असलेली जागा कॉंग्रेसने हिसकावून घेतली. दोन्ही जिल्ह्यांत राष्ट्रवादीची ताकद मोठी असताना मोहनराव कदम यांनी सगळे अंदाज साफ धुळीस मिळवत लक्षणीय विजय मिळवला. कदम यांना 309, तर राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांना 246 मते मिळाली. निकालानंतर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला.

विधान परिषदेसाठी झालेल्या या निवडणुकीची मतमोजणी आज माधवनगर रस्त्यावरील महसूल सांस्कृतिक भवन येथे झाली. दोन्ही कॉंग्रेसने प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक चुरशीने झाली. राष्ट्रवादीची सदस्य संख्या 123 ने जास्त असल्याने त्यांना विजय सहजसाध्य वाटत होता; मात्र मोहनराव कदम यांच्यासाठी कॉंग्रेस नेत्यांनी पद्धतशीर यंत्रणा राबवून राष्ट्रवादीची मते फोडली आणि दोन्ही जिल्ह्यांतून आघाडी मिळवली. त्यामुळे राष्ट्रवादीचा नामुष्कीजनक पराभव झाला.

दोन्ही जिल्ह्यांत एकूण 570 मतदार होते. त्यापैकी 569 मतदारांनी मतदान केले. यातील दहा मते बाद ठरली, तर 559 मते वैध ठरली. कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार शेखर माने आणि साताऱ्यातील अपक्ष उमेदवार मोहनराव गुलाबराव कदम यांना प्रत्येकी दोन मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी मोहनराव कदम विजयी झाल्याचे जाहीर केले. त्यांच्या हस्ते श्री. कदम यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

राष्ट्रवादीच्या गडांना खिंडार...
राष्ट्रवादीचा दावा असा होता, की कॉंग्रेसपेक्षा आपल्याकडे 123 मते अधिक आहेत. त्यामुळे मोहनराव कदम यांना मिळालेल्या 63 मतांची आघाडी पाहता राष्ट्रवादीची 186 मते फुटली, असा अर्थ होतो. साहजिकच राष्ट्रवादीला पडलेले हे मतफुटीचे खिंडार नामुष्कीजनकच आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांवर मोठी धुरा होती. दोघेही दक्ष असताना पृथ्वीराज चव्हाण आणि पतंगराव कदम यांनी राष्ट्रवादीला दिलेला हा धक्‍का आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com