नेत्यांच्या फायद्याकरताच समृद्धी महामार्ग : विखे पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

कोपरगाव तालुक्‍यातील जुने-नवे मार्ग एकमेकांना ओलांडतात. त्याचे विस्तारीकरण झाल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटू शकेल. पण शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करून नेते व अधिकाऱ्यांचा फायदा करून देण्यासाठीच हा समृद्धी महामार्ग आखण्यात आला आहे...

नगर : मुंबई ते नागपूर महामार्ग सध्या अस्तित्वात आहे. त्यावरून वाहतूकही सुरळीत आहे. कोपरगाव तालुक्‍यातील जुने-नवे मार्ग एकमेकांना ओलांडतात. त्याचे विस्तारीकरण झाल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटू शकेल. पण शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करून नेते व अधिकाऱ्यांचा फायदा करून देण्यासाठीच हा समृद्धी महामार्ग असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

गोदावरी कालव्याच्या सिंचन बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना या विषयावर सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सरकारच्या "संवाद यात्रा' व शिवसेनेच्या "शिवसंपर्क अभियाना'चा त्यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. मुंबई ते नागपूर या महामार्गाचे विस्तारीकरण सुरू आहे. समृद्धी महामार्ग या नावाने तो पुढे येत आहे. मार्गालगत येणाऱ्या बऱ्याच जमिनी सरकार ताब्यात घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्‍यातील काही जमिनी जात आहेत. जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. याबाबत विखे यांनी वास्तव मांडून सरकारच्या या निर्णयाचा समाचार घेतला. 

संघर्ष यात्रेत राणे येणार 
कॉंग्रेसच्या संघर्ष यात्रेच्या अंतिम टप्प्यात ज्येष्ठ नेते नारायण राणे सहभागी होणार असल्याचे विखे यांनी सांगितले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करून संघर्ष यात्रेचा शेवटचा टप्पा सुरू होईल. त्यानंतर महाड येथील चवदार तळ्याला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येईल. आमदार नीलेश राणे समारोपाच्या सभेचे नियोजन करीत आहेत. 

मुख्यमंत्र्यांची संवाद यात्रा 
कॉंग्रेसची संघर्ष यात्रा पाहून मुख्यमंत्र्यांनी संवाद यात्रा सुरू करण्याचे जाहीर केले, असा चिमटा काढत विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य केले. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच स्वस्तात तूर देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. शेतकऱ्यांनी स्वस्तात तूर व्यापाऱ्यांना विकली. व्यापाऱ्यांनी जादा दराने सरकारला विकली. फायदा व्यापाऱ्यांचा झाला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. असा आरोप विखे यांनी केला. 

शिवसंपर्क अभियान म्हणजे विश्वासघात 
शिवसेनेचा समाचार घेताना विखे यांनी शिवसंपर्क अभियान म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खिशातील राजीनामे, किंवा ते कपडे कपडे कुठेतरी पडले असावेत, त्यामुळे राजीनाम्याचा विषय बाजूला पडला. शिवसेनेला शेतकऱ्यांत रस नसून केवळ महानगरांमध्ये स्वारस्य असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.