बॅक वॉटरअभावी 22 गावांना टंचाईच्या झळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

जयसिंगपूर : राजापूर (ता. शिरोळ) येथील बंधाऱ्यातील बॅक वॉटरवर शिरोळ, धरणगुत्ती, नांदणी, हरोली, आगर, कोंडीग्रे, जांभळी गावांच्या पिण्याच्या व शेतीचे पाणी अवलंबून आहे. बंधाऱ्यातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात ठेवण्याची मागणी धरणगुत्ती ग्रामपंचायतीने सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली. 

धरणगुत्तीसह नांदणी व हरोली या गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी तर शिरोळ, आगर, कोंडीग्रे, जांभळी गावांना शेतीसाठी पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा होत असतो. हा पाणी पुरवठा पंचगंगा नदीतून होत असला तरी पावसाळा वगळता या पाणी पुरवठा योजनांना कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातील बॅक वॉटरचे पाणी उपलब्ध होते. पंचगंगा नदीचे पाणी प्रदुषीत असून, उन्हाळ्यात पंचगंगेचा प्रवाह खंडीत असतो. राजापूर बंधाऱ्यातील बॅक वॉटरमुळे या गावांना पाणी मिळू शकते. सध्या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खालावल्याने या गावांना दुषीत पाणी प्यावे लागत आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

शेतीला पाणी मिळू शकत नसल्याने पिकेही अडचणीत आहेत. प्रदुषीत पाण्यामुळे पशूधनही संकटात आहेत. पंचगंगेचा प्रवाह सध्या सतत खंडीत होत आहे. राजापूर बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही खालावत असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. बंधाऱ्यातील बरग्यांना गळती लागल्याने लाखो लिटर पाणी बंधाऱ्यातून जात आहे. यामुळे बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या 22 गावांना हक्काच्या पाण्यापासून वंचीत राहण्याची वेळ आली आहे. गतवर्षी बंधाऱ्यातील पाण्याची योग्य पातळी राखली नसल्याने अनेक समस्या उदभवल्या होत्या. तोच प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी बरग्यांना लागलेली गळती काढून पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज आहे. योग्य पातळी राखून या गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी निवेदनात केली आहे. 

कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी सांगली पाटबंधारे विभाग सांगली व शाखाधिकारी पाटबंधारे विभागा नृसिंहवाडी शाखा यांना निवेदनाच्या प्रती पाठविल्या आहेत.