ये ताई का रडतेयस..? ऊठ बोल अन्यायाविरोधात! 

solapur1
solapur1

सोलापूर - महिलांना मारहाण, त्यांचे शोषण, कौटुंबिक कारणावरून छळ, समाजात प्रत्येक पातळीवर होणारी छेडछाड आणि अत्याचाराचे प्रकार आजही सातत्याने घडत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी शासन आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न होत आहेत. अन्याय सहन करत रडत बसण्यापेक्षा महिलांना निडर होऊन बोलायला हवे, न्यायासाठी धाडसाने पुढे यायला हवे, असा सल्ला महिलांसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांनी दिला आहे. 

महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराचे निर्मूलन दिन शुक्रवारी साजरा होतोय. यानिमित्ताने "सकाळ'ने महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार आणि त्यावर कशी मात करता येईल याबाबत तज्ज्ञांशी संवाद साधला. अशिक्षितांसोबतच शिक्षित आणि उच्चवर्गीय कुटुंबांमध्येही महिला असुरक्षित आहेत. महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करायचे असेल तर पालकांनी मुलींना धाडसी बनविणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. 

आजही अनेक उच्चशिक्षित कुटुंबांमध्ये महिलांचा छळ होतोय. नोकरी करणाऱ्या आणि उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या महिलाही यातून सुटलेल्या नाहीत. आपण लहानपणापासून मुलींना शिकवतो की सहन करायचे, गप्प बसायचे. पालकांनी मुला-मुलींमध्ये भेदभाव करू नये. एक माणूस म्हणून महिलांकडे पाहिले पाहिजे. पालकांनी लहानपणापासून मुलींना याबाबत जागृत करणे गरजेचे आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा आहेच, पण समाजानेही आपल्या वर्तनातून महिलांना सन्मान द्यायला हवा. 
- नुसरत खान,  सामाजिक कार्यकर्त्या 

महिलांना आजही स्वातंत्र्य नाही, असे न्यायालयात येणाऱ्या प्रकरणांवरून दिसून येते. रुढी-परंपरेमध्ये महिला अडकल्या आहेत. शिक्षणाचा अभाव आहे. मुलगी शिकून काय करेल, ती दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, अशी भावना आजही दिसते. नोकरीच्या ठिकाणीही त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. कायद्याने महिलांना अधिकार दिले आहेत. महिलांनी न घाबरता अन्यायाचा विरोध करायला हवा. महिला पुरुषांच्या बरोबरीने किंवा त्यांच्याही पुढे जाऊन काम करू शकतात. आज सर्वच क्षेत्रांत महिला अभिमानास्पद कामगिरी करीत आहेत. त्यांची प्रेरणा घेऊन महिलांनी आनंदाने जगावे. 
- अंजली बाबरे, विधिज्ञ 

मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीयांमध्ये महिलांचा छळ मोठ्या प्रमाणात होत आहे. महिला बोलत नाहीत, अन्याय सहन करतात. समुपदेशन केंद्रात येणाऱ्या महिलांमध्ये आम्ही विश्‍वास निर्माण करतो. कोणतेही प्रकरण वाढू नये, त्यांचा संसार आनंदात चालावा यासाठी प्रयत्न करतो. कुटुंबात किंवा समाजात कोठेही अन्याय, अत्याचार होत असेल तर तत्काळ पोलिसांशी किंवा समुपदेशन केंद्राशी संपर्क साधावा. अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो, हे महिलांनी लक्षात घ्यावे. 
- अस्मिता गायकवाड, संस्थापक, ओंकार महिला समुपदेशन क्रेंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com