दीप...

दीप...

प्रकाशाची ओढ सगळ्यांनाच असते. अंधार घाबरवून टाकतो. या अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी आपली सदैव धडपड सुरू असते. हा प्रकाश म्हणजे आपल्यासाठी यशच असते. यशाचा हा प्रकाश सर्वदूर पसरावा अशीही आपली इच्छा असते. कमी प्रकाशातून जास्त प्रकाशात जाण्यासाठीही आपले प्रयत्न सुरू असतात.

एखाद्या गोष्टीची नव्याने सुरुवात केली की चाचपडायला होते. जणूकाही अंधाऱ्या रात्रीत अंदाज घेत आपण पावले टाकत असतो. आपल्याला हवे असणारे यश अजून खूपच दूर अंतरावर असते. कदाचित ते आपल्या दृष्टीच्या  पलीकडेही असते. अशावेळी त्या यशापर्यंत जाणारा मार्ग दिसावा, अशी आपली मनोमन इच्छा असते. तो मार्ग दाखविणारा एखादा प्रकाशाचा स्त्रोत आपल्याला मिळावा असे वाटत असते. 

धडपड करीत आपली वाट शोधणाऱ्या वाटसरूला आजूबाजूचे दिवे दिसत असतात. त्यातील काही दिवे लुकलुकणारे असतात, तर काही अगदी झळाळत असतात. त्यांची ही झळाळी बऱ्याचदा आपले डोळे दिपून टाकते. मग तर स्वत:च्या मार्गावरची वाट नीट दिसत नाही. झळाळणारे हे दिवे आपल्या आजूबाजूला असले तरी त्यांचा प्रकाश आपल्या सोबत सदैव असत नाही. कारण तो दिव्याचा प्रकाश असतो आणि तो त्या दिव्याभोवतीच पसरलेला असतो. 

आजूबाजूला झळाळणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशालाच आपला प्रकाश समजणे हा मोठा भ्रम असतो. काहीवेळा त्या झळाळणाऱ्या दिव्याच्या प्रकाशातून जात असताना आपल्याला आपण यशस्वी झालो आहोत असे वाटते, पण तो केवळ आपला एक भास असतो. आजूबाजूच्या झळाळणाऱ्या दिव्यांना घाबरून आपल्या स्वत:च्या प्रकाशाचा विसर पडणे असेही होऊ शकते. थोडक्‍यात दिमाखात झळकणाऱ्या दुसऱ्या दिव्याच्या प्रकाशाला आपला म्हणणे अथवा त्या प्रकाशात स्वत:चा विसर पडणे, या दोन्ही बाबी आपल्याला आंधळ्या बनवितात. 

आपल्या इच्छित ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपल्याला आपल्या आतील दिवा पेटवावा लागतो. या दिव्याची पेटलेली वात तेवत ठेवण्यासाठी सतत इंधन घालावे लागते. हे इंधन आपल्या आतमध्येच असते. फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. आपल्या आतमध्ये असणारा इंधनाचा महाप्रचंड साठा त्या दिव्याला अनंतकाळ तेवत ठेवू शकतो. आपल्या मार्गावर जाण्यासाठी आपण स्वत: पेटविलेल्या दिव्याच्या ज्योतीचा प्रकाश मार्गदर्शक ठरू लागतो.

जसजसे आपण आपल्या आतील ज्योतीच्या प्रकाशाने उजळलेल्या मार्गावरून पुढे जात राहतो तसतसा त्या ज्योतीचा प्रकाश वाढत जातो. यशाकडे जाणाऱ्या आपल्या मार्गावरील प्रत्येक पाऊल आपल्या आतील दिव्याची ज्योत मोठी करत असतो. आपल्या नकळत या ज्योतीचा प्रकाश चहूकडे पसरायला लागतो. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या दृष्टीने ते आपले यश असते. आपल्या यशाचा प्रकाश आपल्या आतील ज्योतीनेच निर्माण केलेला असतो.

एकदा का आपल्या आतमध्ये असणाऱ्या ज्योतीची आणि तिला सातत्याने तेवत ठेवणाऱ्या इंधनाची आपल्याला जाणीव झाली की मग कसल्याच अंधाराची आपल्याला भीती वाटत नाही. किंबहुना अंधार ही संकल्पनाच आपल्या दृष्टिीकोनातून हद्दपार होते. आपणच आपल्या मार्गाचा दिवा असतो. आपणच त्या दिव्याची सातत्याने तेवणारी ज्योत असतो. ही जाणीव म्हणजेच अनंतकाळची दीपावली असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com