खाकी वर्दीतील गुंडांना मोका लावणार 

v-nangarepatil
v-nangarepatil

सांगली - गृह विभागाची अब्रू वेशीला टांगून गुंडाराज माजवणाऱ्या दोघा पोलिसांवर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली. सांगली शहर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस आणि त्यांचे समर्थक गुंड यांच्यात सोमवारी झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. खाकी वर्दीतील दोघा गुंड पोलिसांना निलंबित केल्याचे कोल्हापूर विभागाचे विशेष महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज जाहीर केले. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून कलम 311 (ब) नुसार बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा श्री. नांगरे आज पत्रकारांशी बोलतांना दिला. दरम्यान, मोकांतर्गंत कारवाईचाही विचार केला जाईल, असे ते म्हणाले. पोलिस शिपाई किरण राजाराम पुजारी (वय 28, उदगाव, ता. शिरोळ), पोलिस शिपाई संतोष हरी पाटील (वय 33, रा. अब्दुललाट, ता. शिरोळ) अशी त्या खाकी वर्दीतील गुंडांची नावे आहेत. 

दरम्यान, दोन पोलिसांसह अकरा जणांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीचा आदेश सुनावण्यात आला. सांगली ग्रामीण पोलिसांनी फरार असलेल्या सागर राजाराम पुजारी याला आज सकाळी ताब्यात घेतला. अधिक माहिती अशी, किरण पुजारी आणि संतोष पाटील हे सांगली शहर पोलिस ठाण्यातील शिपाई म्हणून कार्यरत आहेत. या दोन पोलिसांच्यात गेले काही दिवस वाद सुरू होता. तीन महिन्यांपूर्वी पुजारी याची स्कार्पिओ मोटार (एमएच 10 एस 4) उदगाव येथे पेटवल्याचा प्रकार घडला होता. संतोष आणि त्याचे साथीदार सचिन डोंगरे, अरुण हातंगळे, दत्ता झांबरे यांनी ही मोटार पेटवली असल्याचा पुजारीला संशय होता. त्यातून दोघांमधील वाद धुमसत होता. हा वाद सोमवारी मध्यरात्री उपाळून आला. अंकली (ता. मिरज) आणि उदगाव (ता. शिरोळ) हद्दीतील दोघा पोलिसांच्या समर्थक गुंडामध्ये जोरदार हाणामारी झाली. तलवारी, चाकू, काठ्यांसह पोलिस व त्यांच्या गुंडांची फौज एकमेकांवर तुटून पडली. "फिल्मी स्टाइल'ने चारचाकीतून अपहरण, पाठलाग आणि हाणामारी असा थरार होता. हल्ल्यात संतोष पाटील व किरण पुजारी या दोन पोलिसांसह तिघेजण गंभीर, तर चौघेजण किरकोळ जखमी झाले. त्यानंतर सांगली ग्रामीण व जयसिंगपूर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, अपहरण, आर्म ऍक्‍टप्रमाणे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात अरुण आनंदराव हातंगळे (वय 25, ऐंशी फुटी रस्ता, विश्रामबाग) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिस शिपाई किरण राजाराम पुजारी (वय 28, उदगाव, ता. शिरोळ), राजाराम बाळू पुजारी (वय 53, उदगाव), रोहित सतीश पाटील (वय 19, उत्तर शिवाजीनगर, सांगली), ओंकार पोपटराव मगदूम (वय 19, गावभाग, सांगली), ओंकार दिलीप माने (वय 23, राजवाडा परिसर, सांगली), सुरेश ऊर्फ दादू सोमनाथ बंडगर (वय 26, उदगाव) यांना काल रात्री अटक केली. दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले. आज सकाळी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांच्या पोलिस कोठडीचा आदेश देण्यात आला, तर फरारी सागर राजाराम पुजारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

जयसिंगपूर पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई किरण पुजारी याने काल सकाळी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिस शिपाई संतोष पाटील, सचिन विजय डोंगरे व महेश शिवाप्पा नाईक (वय 25, दोघेही रा. शंभरफुटी रोड, गुलाब कॉलनी, सांगली), दत्तात्रय शामराव झांबरे (वय 20, रा. भोसे, ता. मिरज), रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील ऊर्फ गोट्या प्रकाश कोलप (वय 25, अंकली, ता. मिरज) या पाच जणांना काल रात्री अटक करण्यात आली. त्यांनाही आज न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

पाटील, पुजारीसह 11 जणांना पोलिस कोठडी 
संतोष हरी पाटील व किरण पुजारीसह 11 जणांना पाच दिवस कोठडी मिळाली आहे. खाकी वर्दीतील गुंडांमुळे गृहखात्याची लक्तरे वेशीवर आली आहेत. त्यामुळे संपूर्ण डिपार्टमेंटला संदेश मिळेल अशी कडक कारवाई अपेक्षित आहे. यामध्ये दोन पोलिसांच्या बाजूने जे गुंड सहभागी आहेत त्यांच्यावर एकपेक्षा अधिक गुन्हे असतील तर मोका लागू शकतो, तर या टोळीचा भाग म्हणून देखील पाटील, पुजारी यांनाही या कायद्याचा बडगा बसू शकतो, अशी शक्‍यता व्यक्‍त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com