टवाळखोरांची नावे चौकात झळकणार

टवाळखोरांची नावे चौकात झळकणार

कोल्हापूर - छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांची आता गय केली जाणार नाही. त्यांची नावे चौकाचौकांत पोलिस प्रशासनाकडून झळकवली जातील, असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले. 
बोंद्रेनगरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस चौकी लवकरच सुरू केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी या वेळी केली. 

बोंद्रेनगरात छेडछाडीला कंटाळून गीता बोडेकर या तरुणीने नुकतीच आत्महत्या केली. या पार्श्‍वभूमीवर येथील महिलांसह नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. गंगाई लॉनमध्ये हा कार्यक्रम झाला. 

नांगरे-पाटील म्हणाले, ‘‘बोंद्रेनगरात पल्लवीपाठोपाठ गीता बोडेकर या तरुणीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. या दोन्ही घटना धक्कादायक आहेत. या परिसरात कष्टकरी समाज राहतो. उदरनिर्वाहासाठी लहान वयात मुला-मुलींना काम करावे लागते. उपनगरातील छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून ‘पायलेट प्रोजेक्‍ट’ राबवले जातील. गुन्हेगारांसह छेडछाड करणाऱ्यांविरोधात हद्दपारीचे प्रस्ताव दाखल करण्यात येतील. 

गीता बोडेकरचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्यात विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात येईल.’’ 

परिक्षेत्रात छेडछाडीचे १० हजारांहून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यात ३० टक्के गुन्हेगार हे विवाहित असल्याचे पुढे आले आहे. छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांवर आता कायदेशीर कारवाई करण्याबरोबर त्यांची नावे भर चौकात डिजिटल फलकावर झळकवण्याची मोहीम पोलिस प्रशासनाकडून लवकरच राबवली जाणार आहे. त्यात कोणाचीही गय केली जाणार नाही. बोंद्रेनगरात पोलिस चौकी सुरू होईल. त्यासाठी जागेचेही नियोजन केले आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला सुरक्षा समिती स्थापन करून त्याद्वारे महिला व मुलींचे प्रश्‍न सोडवले जातील. 

पोलिस अधीक्षक महादेव तांबडे म्हणाले, ‘‘नागरिकांनी आपल्या समस्यांबाबत पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. तेथे समाधान न झाल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा. निर्भया पथक शाळा-कॉलेजबरोबर उपनगरे व झोपडपट्टी भागातही कार्यरत राहील.’’ करवीरचे पोलिस उपअधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, ‘‘मुलांवर आई-वडिलांचे संस्कार होणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांच्या तक्रारी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी मित्र बनून पुढे यावे.’’ या वेळी नगरसेविका रिना कांबळे, पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांच्यासह नागरिक, पोलिस उपस्थित होते. 

परिसरातील अवैध धंद्यांची माहिती द्या
बोंद्रेनगर परिसरातील गुन्हेगारी मोडून काढा. येथे मटका, जुगार अड्ड्यासारखा एकही अवैध धंदा दिसता कामा नये, अशा सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केल्या. तसेच नागरिकांसह स्थानिक नगरसेविका रिना कांबळे यांना याबाबतची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहनही केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com