विट्यात धनशक्तीचा पराभव अटळ - आमदार अनिल बाबर

विट्यात धनशक्तीचा पराभव अटळ - आमदार अनिल बाबर

प्रश्‍न - निवडणुकीतील प्रमुख मुद्दा काय?
बाबर - सन २०११च्या निवडणुकीवेळी आमच्या गटाचा पराभव होणार आहे, हे माहीत असतानादेखील केवळ विटेकर जनतेच्या आग्रही मागणीस्तव स्वाभिमानासाठी निवडणूक लढवली. परंतु दुर्दैवाने या निवडणुकीत काही लोकांनी ऐन वेळी दगा दिल्याने आमचा पराभव झाला. मात्र, लढवय्या कार्यकर्त्यांच्या बळावर त्वेषाने निवडणूक लढवली आणि अनेक नागरी समस्यांना वाचा फोडली. तसेच गेल्या पाच वर्षांत नागरिकांना सत्ताधाऱ्यांकडून कोणत्याच मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत पहिले प्राधान्य धनशक्तीचा पाडाव करणे हे असून विट्याचा सर्वांगीण विकास घडविणे हाच मुद्दा घेऊन मैदानात उतरलो आहोत.

प्रश्‍न - सदाशिवरावांच्या प्रदीर्घ सत्तेचा अर्थ विकास झाला असा घ्यायचा का?
बाबर -
 गेली ४५ वर्षे एकाच घराण्याची सत्ता आहे. त्यांनी केवळ पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे समीकरण वापरून धनशक्तीच्या जोरावर आजवरच्या निवडणुका जिंकल्या आहेत. परंतु सत्ताधाऱ्यांच्या मनमानी आणि भ्रष्टाचारी कारभाराला विटेकर जनता अक्षरश: आता कंटाळली आहे. त्यामुळे विधानसभेला विटेकरांनी माझ्या पाठीशी उभे राहत चांगले मताधिक्‍य दिले. त्यामुळे जनतेच्या पाठबळावरच मी आमदार झालेलो आहे. 

प्रश्‍न - आमदार म्हणून शहरात कोणतेच भरीव काम आपण केले नाही, अशी टीका होते आहे? 
बाबर -
  विधानसभेला माझ्यावर विश्‍वास ठेवत जनतेने मला आमदार केले. त्यामुळे जनतेच्या मताचा आदर राखत शहरातील विविध विकासकामांसाठी आमदार फंडातून कामे आणली; परंतु त्याला सत्ताधाऱ्यांनी एनओसी नाकारत खोडा घालण्याचे काम केले, याची विटेकरांना कल्पना आहे. दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू योजनेच्या पूर्णत्वासाठी शासन दरबारी पाठपुरावा करतोय. विटा हद्दीतील सुळकाई रस्त्याच्या कॅनॉलचे काम पूर्ण करून टेंभूचे पाणी ढवळेश्‍वर तलावात सोडण्यासाठी मी प्रयत्न केला आहे. हे पाणी आल्यास विटा परिसरातील १० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

प्रश्‍न - तुम्हाला विजयाची खात्री का वाटते? 
बाबर -
 कुणाला नामोहरम करण्यासाठी किंवा व्यक्तिद्वेषातून निवडणूक लढवत नाही, तर विटेकर सर्वसामान्य जनतेसाठी लढवत आहे. विकासाचा अजेंडा घेऊनच पूर्ण ताकदीनिशी उतरत आहे. धनशक्तीच्या जोरावर निवडणुका जिंकणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनताच या वेळी घरी बसवून विटा पालिकेत परिवर्तन घडविणार आहे. विधानसभेप्रमाणे याही निवडणुकीत विटेकर जनतेचा आम्हाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे.  भ्रष्ट कारभाराला जनता आता वैतागलेली आहे. जनतेला बदल हवा आहे आणि तो आमच्या रूपानेच पाहिजे. त्यामुळे आमचा विजय शंभर टक्के निश्‍चित आहे.

प्रश्‍न - तुमची निवडणुकीची रणनीती काय असेल?                        
बाबर -
 सध्या केंद्रात आणि राज्यात युतीचे सरकार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी मित्रपक्ष भाजपची आम्हाला साथ मिळाली आहे. निवडणूक शिवसेना - भाजप युतीच्या माध्यमातून लढवत आहे. विटा शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर राज्य सरकारकडून अधिकचा निधी आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, ही बाजू जनतेला नक्‍की अपील होईल. आम्ही निवडणुकीसाठी उमेदवार देताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा प्राधान्याने विचार केला आहे. सध्या प्रस्थापितांविरुद्ध जनमत सर्वत्र दिसते आहे. याचा फायदा विरोधक म्हणून आम्हालाच होईल. 

बाबर काय म्हणाले...

  • यंदा विटा पालिकेवर भगवा फडकणारच
  • सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराला जनता वैतागली
  • केवळ विकासाच्या अजेंड्यावर निवडणुकीला सामोरे जाणार 
  • शिवसेनेचे सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार
  • राज्यातील सत्तेचे लाभ विट्याच्या विकासाठी आणू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com