'आदर्श'च्या विद्यार्थ्यांनी बनविला सौर ऊर्जेवर चालणारा अभिनव प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

विटा - आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्‍ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांनी वीज वाचवा, देश वाचवा असा संदेश देत सौर ऊर्जेवर चालणारा अभिनव प्रकल्प यशस्वीपणे बनविला आहे. या प्रकल्पामुळे महाविद्यालयांतील इलेक्‍ट्रिकल विभाग पूर्णतः सौर ऊर्जेवर चालतो. सौर ऊर्जेचा वापर करणे, ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे आदर्श इन्स्टिट्यूट पॉलिटेक्‍निक कॉलेजमधील इलेक्‍ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांनी वीज वाचवा, देश वाचवा असा संदेश देत सौर ऊर्जेवर चालणारा प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पामुळे प्रतिमहिना 4 हजार 500 रुपयांची, तर वार्षिक 54 हजार रुपयांची महाविद्यालयांतील वीज बिलामध्ये बचत होत आहे. विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर तयार केलेला महाराष्ट्रातील पहिला यशस्वी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 1 लाख 50 हजार इतका आला असून त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री विद्यार्थ्यांनी व आदर्श महाविद्यालयाने उपलब्ध केली आहे.

विद्यार्थ्यांना इलेक्‍ट्रिक विभागप्रमुख प्रा. राजेंद शिंदे, प्रसाद अनुगडे, प्रभुदास कुंभार, संजय भोसले, विक्रम कदम यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे माजी आमदार ऍड. सदाशिवराव पाटील, वैभव पाटील, संचालिका पूजा पाटील, कार्यकारी संचालक पी. टी. पाटील व प्राचार्य डी. के. महाडिक यांनी अभिनंदन केले.