विट्यात लवकरच होणार भारतातील सर्वांत मोठी तालीम

wrestling-training-center
wrestling-training-center

विटा - आजच्या आधुनिक काळात लाल मातीतील कुस्ती आणि पैलवानकी संपुष्टात येते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, याच लाल मातीतून तयार झालेल्या डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांच्या संकल्पनेतून विट्यात लवकरच भारतातील सर्वांत मोठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची तालीम आणि राष्ट्रकुल
कुस्ती आखाडा (संकुल) साकारणार आहे. या संकुलाची उभारणी करण्याच्या दृष्टीने पै. चंद्रहार यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

दुष्काळी खानापूर तालुक्यातील भाळवणीसारख्या खेड्यातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चंद्रहार पाटील यांनी कुस्तीवर असणाऱ्या विशेष प्रेमामुळे एम. ए. एम. पीएडची पदवी मिळवून देखील त्यांनी कुस्तीसारख्या रांगड्या खेळात करियर करण्याचा धाडसी निर्णय घेतला. दुष्काळी भाग आणि घरची बेताची प्रतिकूल परिस्थिती तरीही मोठ्या जिद्दीने हिंदकेसरी गणपतराव आंदळकर व राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुस्तीत पैलवानकी केली आणि गाजवली. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वात मानाचा आणि प्रतिष्ठेचा
 “महाराष्ट्र केसरी” किताब त्यांनी सलग दोनवेळा मिळवून आपले नाव सुवर्णअक्षरांनी नोंदवले आहे.

महाराष्ट्राला कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे पै. राम सारंग हे पै. चंद्रहार यांचे गुरू. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आणि कुस्तीच्या धड्यामुळेच पै. चंद्रहार यांचा कुस्ती क्षेत्रात नावलौकीक झाला आहे. शिष्याला आपल्या गुरूच्या उपकाराची परतफेड करणे कोणत्याही शिष्याला अशक्य असते. परंतु गुरू राम सारंगसरांच्या उपकाराची गुरुदक्षिणा म्हणून परतफेड "राष्ट्रकुल कुस्ती संकुल” या संकल्पनेच्या माध्यमातून व्हावी, यासाठी पै. पाटील यांनी आपल्या विट्यातील स्वतः च्या अडीच एकर जागेत कुस्ती संकुल उभारणीचा निर्धार केला आहे. या तालीममध्ये उपलब्ध केल्या जाणाऱ्या सर्व सोईसुविधा तसेच कुस्ती संकुल उभारणीसाठीचा एकूण अपेक्षित खर्च किमान 7.5 कोटी रुपये इतका आहे.

या संकुलात ऑलिंपिक गेम्सच्या तोडीचे दोन भव्य वातानुकूलित मॅट हॉल व सुसज्ज माती आखाडा, सुसज्ज सिंथेटिक ट्रॅक आणि स्विमिंग टॅंकची उभारणी केली जाणार आहे. मातीतल्या कुस्तीवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. आखाड्यात घाम करणाऱ्या मल्लाना सकस व पौष्टिक दूध मिळवून देण्यासाठी कुस्ती संकुल स्वतः दुधाच्या निर्मितीसाठी धारोष्ण गाई - म्हैशीचे पालन करून पैलवानांसाठी दूध निर्मिती केली जाणार आहे. अत्याधुनिक व्यायाम साहित्य असणारी जिमची सुविधा देखील उपलब्ध असेल. 

राष्ट्रकुल कुस्ती संकुलाचे डिसेंबर 2018 मध्ये भूमिपूजन भारतातील सर्वात मोठ्या राष्ट्रकुल कुस्ती संकुलाच्या उभारणी कामाचा भूमिपूजन कार्यक्रम येत्या डिसेंबरमध्ये कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांची पै. चंद्रहार पाटील यांनी स्वतः भेट घेऊन या संकुलाच्या उभारणीची माहिती दिली आहे. त्यांनी या भूमिपूजन कार्यक्रमासाठी येण्याचे मान्य केले आहे.

पै. चंद्रहार होणार वस्ताद
पै. चंद्रहार पाटील यांनी आपल्या कुस्तीतील कारकिर्दीत अनेक दिग्ग्ज मल्लांशी टक्कर देत त्यांना आस्मान दाखवले आहेे. बॅक थ्रो सारख्या अवघड डावावर कमांड असणारे पै. चंद्रहार हे चटकदार कुस्त्या करण्यात चांगलेच माहीर होते. परंतु आता आपल्या कुस्तीतील अनुभवाचा वारसा नवोदित मल्लाना देण्यासाठी कुस्ती संकुलाची उभारणी केली जात आहे. या संकुलात ते वस्तादाच्या भूमिकेत असणार आहेत.

राष्ट्रकुल कुस्ती संकुलाची वैशिष्ट्ये :
* भारतातील सर्वात मोठी व अद्यावत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध असणारी पहिली तालीम 
* विस्तृत अडीच एकर क्षेत्र
* कुस्ती संकुल उभारणीचा अपेक्षित खर्च 7.5 कोटी रुपये 
* वातानुकूलित भव्य माती व मॅट हॉल
* सिंथेटिक ट्रॅक
* सुसज्ज स्विमिंग टॅंक
* आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनुभवी, तज्ञ व नामांकित कुस्तीकोच
* भव्य व अत्याधुनिक जिम, लेक्चरहॉल, स्टडीहॉल, लायब्ररी, स्कुलबस सुविधा
* दुग्धनिर्मितीसाठी स्वयंपूर्ण गोठा

"उत्तरेतील मल्लाच्या तुलनेत आपल्याकडील मल्लाना माती आणि मॅटवरील कुस्तीचे अद्यावत, तंत्रशुद्ध टेक्निकचे प्रशिक्षण महाराष्ट्रात उपलब्ध होत नाही. त्यामुळे तंत्रशुद्ध टेक्निकच्या प्रशिक्षणासाठी परराज्यात जावे लागत आहे. कुस्तीवर असणाऱ्या माझ्या जीवापाड प्रेमामुळे आणि गुरू राम सारंगसरांच्या उपकाराची परतफेड गुरुदक्षिणा म्हणून मी विट्यात राष्ट्रकुल कुस्ती संकुलाच्या उभारणीचा संकल्प केला आहे. कुस्तीची चालत आलेली परंपरा जपण्यासाठीच माझा एक छोटासा प्रयत्न आहे. या संकुलाच्या उभारणीचा खर्च पाहता मला एकट्याला हे शक्य नाही. त्यामुळे माझ्या या संकल्पपूर्तीसाठी समाजातील दानशूर कुस्तीप्रेमींनी पुढे येऊन मला आर्थिक मदतरुपी साथ द्यावी."
- पै.चंद्रहार पाटील (डबल महाराष्ट्र केसरी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com