आत्ममग्न नेत्यांना मतदारांचा जोर का झटका

आत्ममग्न नेत्यांना मतदारांचा जोर का झटका

सांगली - जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला. अर्थात हा फटका भाजपने दिला म्हणण्यापेक्षा दोन्ही पक्षांच्या आत्ममग्न झालेल्या नेत्यांना मतदारांनी दिलेला हा झटका आहे. ग्रामीण मतदारांमध्ये भाजपची कसोटी आहे, असे म्हणणाऱ्या नेत्यांना जनतेने सपशेल झिडकारून भाजपला विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केले आहे. आता मिनी मंत्रालयाच्या निकालात नापास झालेल्या या दोन्ही पक्षांचे नेते अर्थात जिल्हाध्यक्ष जबाबदारी स्वीकारणार का? हा प्रश्‍न आहे.

जिल्हा परिषदेवर कायमच काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे  वर्चस्व राहिले होते. जिल्हा बॅंक, बाजार समिती, सहकारी बॅंका, कारखाने, विकास सोसायट्या, दूध संस्था अशी सहकारी संस्थांची ताकद स्वत:कडे ठेवल्याने आपल्याला कधी जिल्हा परिषदेत फटका बसू शकेल हे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना स्वप्नातही वाटले नसेल. त्यामुळे नेहमीच कुठल्या ना कुठल्या तरी सत्तेत असणाऱ्या या नेत्यांना जिल्हा परिषदेत झटका बसला हे एका दृष्टीने बरेच झाले, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे. याचा विचार करून आपण नेतृत्वात कमी पडलो, कार्यकर्त्यांना संधी देण्याची व्यापक दृष्टी न ठेवता आत्मकेंद्री निर्णय घेतल्याने आपल्याला मतदारांनी झिडकारले आहे हे  मान्य करण्याचे धाडस दाखवण्याची ताकद यातील  एकाही नेत्याकडे नाही. त्यामुळेच ‘जनतेचा कौल मान्य आहे. त्याचे आत्मपरीक्षण करू’ अशी सरधोपट  प्रतिक्रिया नेते देत आहेत.

खरे तरे जिल्हा परिषदेपूर्वी काँग्रेसने नगरपालिका निवडणुकीत आणि विधान परिषदेत चांगले यश  मिळवले. त्यावेळी काँग्रेसची जिल्ह्यात सुप्त लाट वाटत होती. विधान परिषदेवेळी दादा आणि कदम गटातील मतभेद प्रदेशाध्यक्षांसमोर उघड झाले होते. तरीही ग्रामीण भागात पक्षाची ताकद मोठी वाटत होती. त्यामुळे एक नंबरला काँग्रेस येण्याची आशा होती. मात्र, उमेदवारी याद्यांवरूनच नेत्यांमध्ये धुसफूस सुरू झाली. त्याचा स्फोट मुंबईतील बैठकीत झाला आणि निकालात पक्ष उद्‌ध्वस्त झाला. जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांची ख्याती खरे तर सर्वांना सोबत घेऊन जाणारे अशी होती. त्यांच्या विधान परिषदेवरील विजयामुळे जिल्ह्यात  काँग्रेस बळकट होईल असे वाटत होते.

प्रत्यक्षात झाले उलटेच.
काँग्रेसच्या दादा आणि कदम गटातील वादाची परिणती पक्षाची धूळधाण होण्यात झाली आहे. विशाल पाटील आणि प्रतीक पाटील यांनी तिकीट वाटपात मिरज तालुक्‍यात हस्तक्षेप चालवून घेतला नाही. तरीही पक्षाला केवळ तीनच जागा मिळाल्या. दोघे बंधू प्रचारात कुठे प्रकर्षाने दिसले नाहीत. तीच स्थिती कदम घराण्याची. पलूस, कडेगावमध्ये स्वत:च्या मर्जीप्रमाणे सगळे केले. पण निकालात सगळे चित्र उलटेच दिसले.

जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम सुनेला निवडून आणण्यात व्यस्त होते. पण पतंगराव कदम, विश्‍वजित कदम हे पक्षाचे स्टार प्रचारक असूनही त्यांनी पलूस, कडेगावच्या बाहेर लक्ष दिले नाही. तरीही केवळ एकच जागा आली. 
काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीचे नुकसान कमी झाले असे म्हटले तरी त्यांनाही गतवेळेपेक्षा १९ जागांचे नुकसान झाले आहे. आमदार जयंत पाटील यांचे एक हाती  वर्चस्व पक्षावर आहे. मात्र मोठे शिलेदार सोडून गेल्याने पक्ष अडचणीत आला. वेगाने झालेले पक्षाचे आऊट गोईंग ते रोखू शकले नाहीत. या निवडणुकीत  जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे हे सुद्धा पुत्राच्या प्रचारात अडकून पडले. तरीही मुलाचा पराभव ते रोखू शकले नाहीत. अखेरच्या क्षणापर्यंत पक्ष सोडून नेते जात असताना त्यांनी काय केले? असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडला. 

दोन्ही पक्षांकडे ताकदीचे नेते असताना त्यांचे पानिपत झाले. असे का? निवडणुकीचे वारे समजू नये इतकी वाईट अवस्था त्यांची झाली का? आपल्या हटवादीपणाने पक्षाचे नुकसान झाले. दोन्ही पक्षांत गटबाजी आहे हे उघड आहे. राष्ट्रवादीचे नेते बाहेर पडले, तर काँग्रेसचे नेते अद्याप तरी पक्षातच आहेत. मात्र त्यांच्यातील वाद जगजाहीर आहेत. हे वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला नाही, हेसुद्धा पराभवाचे मोठे कारण आहे. त्याची जबाबदारी निश्‍चितच दोन्ही जिल्हाध्यक्षांवर आहे. ते आता पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारणार का? अर्थात त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असे नाही, पण पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसला आहे हे मान्य करावे लागेल.

सदाशिव पाटलांचे पत्र अंजन घालणारे
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सदाशिव पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत गटबाजी संपवण्यात अपयश येत आहे आणि नजीकच्या काळातही यात  फारसा फरक पडणार नाही. व्यक्तिकेंद्रित राजकारण, कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी याचा परिणाम म्हणून पक्षाची कामगिरी सुमार झाल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. हे पत्र प्रदेशाध्यक्षांना त्यांनी पाठवले आहे. यातून नेत्यांच्या डोळ्यात अंजन घातले जावे. ही वस्तुस्थिती सर्वज्ञात असताना नेते मात्र आपलाच पक्ष सत्तेत येणार असे  ठासून सांगत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com