कचऱ्यावरून महापालिका सभेत राडा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

कोल्हापूर - केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे शहरात कचरा उठावासह आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांवर शुल्क आकारण्याच्या विषयावरून सत्तारूढ दोन्ही कॉंग्रेस विरुद्ध भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांत रणकंदन झाले.

कोल्हापूर - केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे शहरात कचरा उठावासह आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांवर शुल्क आकारण्याच्या विषयावरून सत्तारूढ दोन्ही कॉंग्रेस विरुद्ध भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांत रणकंदन झाले.

एकमेकांना शिवीगाळ, अंगावर धावून जाण्याचा प्रकार आज सभागृहात घडला. नगरसेवक सुनील कदम, सत्यजित कदम विरुद्ध प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, शारंगधर देशमुख आक्रमक झाले. ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने सभागृहाला आखाड्याचेच स्वरूप आले होते. इतर काही नगरसेवकांनी मध्यस्थी केली. त्यामुळे बाका प्रसंग टळला. महापौर अश्‍विनी रामाणे यांनीही, ""या वेळी असे वर्तन करू नका, भांडण करायचे असेल तर बाहेर जा,'' अशा शब्दांत नगरसेवकांना सुनावले. या प्रकारामुळे महापालिकेच्या सभागृहात वातावरण तणावपूर्ण बनले. 

केंद्राच्या धोरणानुसार आता स्वच्छता कर आकारण्यात येणार आहे. या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. त्यावेळी सुनील कदम यांनी ""तुम्ही नागरिकांना कर लावणार, पण सुविधा काय देता?'' असा सवाल केला. प्रा. जयंत पाटील यांनी ""तुम्ही सुविधा देणार की, कराची वसुली करणार?' असा मुद्दा उपस्थित केला. वड्याच्या गाडीला 20 रुपये कर आणि चिकनच्या गाडीला 2 रुपये कर, अशी तफावत का? असा सवाल संतोष गायकवाड, प्रा. जयंत पाटील यांच्यासह काही नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यावेळी डॉ. विजय पाटील यांनी हा प्रस्ताव समजून सांगितला. त्यानंतर "आमची या विषयाला उपसूचना आहे. उपसूचनेसह हा विषय मंजूर करा', अशी भूमिका कॉंग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, प्रा. जयंत पाटील यांनी घेतली; तर "भाजप-ताराराणी आघाडीचा त्याला विरोध आहे. हा विषय नामंजूर करा', असे सुनील कदम, सत्यजित कदम, विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, अजित ठाणेकर यांनी ठणकावून सांगितले. तौफिक मुल्लाणी म्हणाले, ""हा केंद्राचा प्रस्ताव आहे. जसाच्या तसा महापालिकेने आणला आहे. त्यामुळे तो नामंजूर करू नये.'' 

सतारूढ आघाडीने उपसूचना देऊन हा विषय मंजूर करा, असे म्हणताच विरोधी आघाडीच्या सुनील कदम, संभाजी जाधव, सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, किरण नकाते यांनी उपसूचना काय ते दाखवा, तसे चालणार नाही, असे म्हणत तीव्र विरोध केला. आत्तापर्यंत अनेकदा अशा उपसूचना दिल्याचे सत्तारूढ आघाडीने सांगितले. त्यावरून वादाला सुरवात झाली. या वेळी आयुक्तांनीही उपसूचना सभागृहात वाचून दाखवायला हवी, असे मत व्यक्त केले. त्यानंतर उपसूचनेवरून वातावरण तापले. प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव शारंगधर देशमुख, सुभाष बुचडे हे कॉंग्रेसकडून आक्रमक झाले; तर विरोधी आघाडीकडून सुनील कदम, संभाजी जाधव, किरण नकाते, कमलाकर भोपळे, सत्यजित कदम आक्रमक झाले. या वेळी सुनील कदम आणि जयंत पाटील यांच्यात वाद झाला. एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. सत्तारूढ आणि विरोधक एकमेकांना भिडले. मुरलीधर जाधव आणि सुनील कदम यांच्यातही वाद झाला. अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. अखेर तौफिक मुल्लाणी, सत्यजित कदम यांनीच मध्यस्थी करत आक्रमक सदस्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. 

हा प्रकार महापौरांच्या आसनासमोरच सुरू होता. त्यामुळे महापौरही संतप्त झाल्या. त्या म्हणाल्या, ""आपण येथे जनतेचे प्रश्‍न सोडवायला आलोय. एकमेकांबरोबर भांडायला आलो नाही. ज्यांना भांडायचे आहे. त्यांनी बाहेर जावे,'' असे म्हणत त्यांनी भांडखोर सदस्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. 

कदमांचा धनादेश नाकारला 
""आयुक्तांच्याच केबिनमधला सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याने हे शहर सेफ सिटी नाही तर असुरक्षितच आहे,''असे म्हणत भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून सभागृहात प्रवेश केला. सुनील कदम यांनी आयुक्तांच्या कार्यालयात सीसीटीव्ही बसवण्यासाठी दहा हजार रुपयांचा धनादेश दिला; पण लेखापाल संजय सरनाईक यांनी हा धनादेश स्वीकारता येणार नसल्याचे स्पष्ट केले. 

अंपगाना लवकरच केबिन 
अपंग बांधवांना केबिन देण्याचा विषय सभागृहात मंजूर झाला. लवकरात लवकर त्यांना केबिन द्या. घरापासून जवळच्या आणि व्यवसाय होईल, अशाच ठिकाणी केबिन द्या, असे शारंगधर देशमुख यांनी सांगितले तर भूपाल शेटे यांनी तयार करून ठेवलेल्या केबिन सडत आहेत. त्यामुळे ठेकेदारांकडून त्या पुन्हा नवीन करून घ्या, अशी सूचना शेटे यांनी केली. 

"रंकाळ्याचा पाट बंद करणाऱ्यांवर कारवाई करा' 
रंकाळा तलावातून बाहेर पडलेला पाण्याचा पाट बांधकाम व्यावसारिकांनी बंद केला आहे. एक शॉपिग मॉल आणि काही अपार्टमेंटच्या खालून हा पाट गेला होता. या पाटावर इमारती बांधायला परवानगी दिली कोणी? असा सवाल नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित करून संबधितावर कारवाईची मागणी केली. 

"महिलांसाठी जिमचा विषयही मंजूर नाही' 
प्रभाग क्रमांक 58 संभाजीनगर येथे महापालिकेच्या ताब्यातील इमातीत महिलांसाठी जिम करण्याचा किरण नकाते यांचा सदस्य ठरावही मंजूर करण्यावरून वादावादी झाली. त्यामुळे हा विषय मागे घेण्याची वेळ आली. महिलांच्या जिमसाठी आपण खासदार महाडिक यांच्या फंडातून निधी आणणार होतो; पण यालाही राजकीय दृष्टिकोनातून मंजुरी दिली नसल्याचे नकाते यांनी सांगितले.