सांडपाणी पुनर्वापर, आवास योजनेत आदर्श

सांडपाणी पुनर्वापर, आवास योजनेत आदर्श

सातारा - नदीकाठचे गाव म्हटलं की सगळं सांडपाणी बेधडकपणे नदीत मिसळते. पण, त्याला अपवाद कोरेगाव तालुक्‍यातील धामणेर गाव आहे. तीन हजार ९६ मीटर बंदिस्त गटार बांधून, त्यावर दोन ठिकाणी शुद्धीकरण केले जाते आणि ते पाणी पुन्हा सार्वजनिक बागा, परसबागांना वापरले जाते. भूमिहिन बेघरांना घरांसाठी ग्रामपंचायतींमार्फत जागा देणाऱ्या धामणेरने यासह विविध उपक्रम, शासकीय योजना प्रभावीपणे राबवत जिल्ह्यात ‘स्मार्ट ग्राम’ होण्याचा बहुमान मिळविला. 

सांडपाणी, कचरा ही समस्या शहरांबरोबर आता ग्रामीण भागालाही भेडसावत आहे. सांडपाणी गटाराद्वारे थेट नदी, नाल्यांत सोडले जात असल्याने त्याचा घातक परिणाम आरोग्यावर होत आहे. ही समस्या टाळण्यासाठी धामणेरने सांडपाणी पुनर्वापराचा प्रयोग राबविला आहे. दोन हजार ६५० लोकसंख्या, ५४१ कुटुंबसंख्या असलेल्या या गावाने गटार बंदिस्त केले आहे. त्यातून सर्व गावचे सांडपाणी दोन ठिकाणी एकत्र करून तेथे जलशुध्दीकरणाचा प्रकल्प राबविला आहे. पुढे हे सांडपाणी सार्वजनिक बागा, उद्याने व रोपांसाठी वापरले जात आहे. 

वर्षानुवर्षे भटक्‍या स्वरूपात राहिलेल्या कातकरी, पारधी या भूमिहिन, बेघर लोकांना निवारा देण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष प्रयत्न केले आहेत. नऊ कुटुंबांसाठी पाच गुंठे जागा ग्रामपंचायतीमार्फत दिली असून, शासनाच्या आवास योजनेतून त्यांना एकत्रित घरेही बांधून देण्याचे काम सुरू आहे. तसेच गावात जमीन तोकडी असून, नाथपंथी समूहातील लोकांकडून दफन विधी केले जात होते. जागांचा प्रश्‍न विचारात घेऊन, या समाजात जागृती करण्याचे अलौकिक काम ग्रामस्थांनी केले. त्यातून मृतदेह दफन करण्याऐवजी आता दहन करण्याची प्रथा या समाजाने अंगिकारली आहे. 

पाच कुटुंबीयांनी गोबर गॅस यंत्रणा बसविली आहे, तर काही सार्वजनिक शौचालयांवर बायोगॅस यंत्रणा कार्यान्वित करून, त्याद्वारे पाच कुटुंबीयांना स्वयंपाकासाठी गॅस पुरविला जात आहे. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांमध्ये तीन कुपनलिकांवर सौरऊर्जाचे पाणी उपसा पंपही बसविले आहेत. वीज बचत करण्यासाठी एक हजार १२९ एलईडी बल्बचा वापर केला जातो. त्यामुळे विजेचा खर्चही कमी होत आहे. ३१ मार्चअखेर ग्रामपंचायतीने शंभर टक्‍के वीज बिल भरणा केला आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर तीन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, अजून १३ ठिकाणी हे कॅमेरे बसवून गाव सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामपंचायतीचे स्वत:चे संकेतस्थळ असून, ग्रामसभांसह इतर महत्त्वाच्या सूचना एसएमएसद्वारे दिल्या जातात. शंभर टक्‍के गाव शौचालययुक्‍त आहे. शिवाय, गावात ५८ बचत गट असून, एक हजार १८० पैकी ८३९ महिला बचत गटाच्या सदस्य आहेत. स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन होण्यासाठी करिअर मार्गदर्शन केंद्र, वाचनालय सुरू आहे, अशी माहिती ग्रामसेवक सुरेश लादे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com