शुद्धतेच्या लेबलखाली पाण्यात फसवणूक

शुद्धतेच्या लेबलखाली पाण्यात फसवणूक

कोल्हापूर - शुद्ध पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाणी गळी उतरविण्याचा उद्योग जोरात सुरू आहे. मिळेल तेथून पाणी भरून पैसे मिळविण्याच्या उद्देशाने ‘मिनरल वॉटर’ विकले जात आहे.

मध्यंतरी कागल आणि नवलेवाडी (ता. पन्हाळा) येथे पाण्याचे कॅन अन्न, औषध प्रशासनाने जप्त केले. शहरात याचे लोण पसरू लागले असून थेट कागलहून पाणी आणून २० लिटरच्या कॅनमधून विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाजी पेठेतील ब्रह्मपुरी येथे एकावर कारवाई झाली. २० लिटरचे ३० कॅन जप्त झाले. तिन्ही ठिकाणी अन्न, औषधचा परवाना नसल्याचे उघड झाले. दोन वर्षांपूर्वी अशीच कारवाई झाली होती. 

उन्हाळा सुरू झाला की, लोकांची पाण्याची गरज वाढते. तहान लागली की, लोक मिळेल ते पाणी पिण्यापेक्षा पाण्याची बाटली विकत घेण्यास प्राधान्य देतात. अलीकडे मोठमोठी कार्यालये, कार्पोरेट कंपन्या यांना २० लिटरचे कॅन पुरविले जातात. कमी गुंतवणुकीत व्यवसाय उभा राहतो. शेवटी पाणी कुठून आणले, याची कुणी विचारणा करत नाही. बाटलीला पॅकिंग असल्याची खात्री झाली की, ती विकत घेतली जाते. पाण्यासारखा पैसा डोळ्यांसमोर दिसू लागल्याने या व्यवसायाकडे मंडळी वळली आहेत. पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा कशी असावी, पाण्याचा स्रोत कसा असावा, रासायनिक प्रक्रिया कशी करावी, याचे नियम आहेत; मात्र प्लॅन्ट उभारण्याऐवजी मिळेल तेथून पाणी मग विहिरीचे असो, बोअरवेलचे असो, हे पाणी थेट कॅन अथवा बाटल्यांमध्ये भरून ते मिनरल वॉटर असल्याचे भासविले जाते.

अन्न, औषध प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने तेही सक्षमतेने कारवाई करू शकत नाहीत. तरीही जेवढे शक्‍य आहे, तितका मोर्चा वळवून कारवाई होते.
 

प्रवाशांचा गैरफायदा....
शुद्ध पाण्याच्या लिटरच्या बाटलीची किंमत २० रुपये इतकी आहे. महालक्ष्मी दर्शनासाठी येणारे प्रवासी हमखास अशा पाण्याचाच वापर करतात. मध्यवर्ती बसस्थानक परिसर आणि ई वॉर्डमध्ये हॉटेल, खानावळी येथे विकतच्या पाण्याचाच अधिक वापर होतो. त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. दरवर्षी उन्हाळा आला की, शुद्ध पाण्याच्या नावाखाली फसवणूक सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com