जलसंधारणातून पुसला ‘दुष्काळी’ शिक्का

जलसंधारणातून पुसला ‘दुष्काळी’ शिक्का

सातारा - दुष्काळात होरपळून निघालेले... २००२-०३ पूर्वी टॅंकर पाचवीला पुजलेला गाव. मात्र, गावात एकजुटीने ‘सुकाळ’ आला... जलसंधारणाची कामे झाली... दोन लाख १५ हजार रोपांनी वृक्षराजी बहरली... आज हेच गाव १५ वर्षांपासून शेजारील गावांसाठी जलदायिनी बनले आहे. रेनवॉटर हार्वेटिंगचा प्रयोग राबवून ‘पाणीच पिकविण्या’चे काम सुरू आहे... हे गाव म्हणजे पाचवीला दुष्काळ पुजलेल्या माण तालुक्‍यातील लोधवडे...

राज्य सरकारने राबविलेल्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान लोधवडेने मिळविला. यापूर्वीही अनेक शासकीय योजनांवर मोहर उमठवलेले लोधवडे हे गाव २००२ पूर्वी दुष्काळी गर्तेत अडकले होते. लोकसंग्रह, शासकीय योजनाची अंमलबजावणी आणि गावचे सुपुत्र व कोकणचे आयुक्‍त प्रभाकर देशमुख हे लोधवडेकरांच्या भक्‍कम बाजू ठरल्या. जलसंधारणासाठी एकवटल्यामुळे सिमेंट बंधारे, सिमेंट नालाबांध, डीप सीसीटी, साधी सीसीटी, कंपार्टमेंट बंडिंग, लूज होल्डर, माती नालाबांध आदींसह अनेक कामे झाली. या कामांमुळे दुष्काळी गावात डिसेंबरअखेरपर्यंत नऊ किलोमीटरचे ओढा पात्र प्रवाही राहत आहे. कायमस्वरूपी टॅंकरग्रस्त असणारे हे गाव आता जलस्वयंपूर्ण असून, शेजारील तीन गावांसाठी दररोज सात ते आठ टॅंकर पाणी देत आहे. २०१२-१३ च्या दुष्काळातही स्वत:ची तहान स्वत: भागविली. 

नंदनवन पाणलोट विकास कार्यक्रमातून लोधवड्यात ४३२ हेक्‍टरवर जलसंधारणाची कामे झाली. त्यासाठीची २० टक्‍के निधी लोकसहभागातून उभारण्यात आला. आजवर गावात दोन लाख ३० हजार रोपे लावली असून, त्यातील सुमारे दोन लाख १५ हजार रोपे जगली आहेत. प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, आरोग्य केंद्रातील रोपांना ठिबकद्वारे, तर इतर रोपांना टॅंकरद्वारे पाणी घातले जात आहे. जलसंधारणाबरोबर सांडपाणी पुनर्वापरातही भरारी घेतली आहे. गटाराद्वारे पाणी एकत्र करून ते तळ्यात शुद्ध केले जाते. तीन टप्प्यात शुद्ध केल्यानंतर ते परसबाग, ओढ्यात सोडले जाते. गावात १३० परसबागा आहेत. ग्रामपंचायतीची पाच हजार स्क्‍वेअर फूट इमारती, दोन सार्वजनिक इमारती, मीडिया सेंटर, हनुमान मंदिरावरही रेनवॉटर हार्वेस्टिंग केले आहे. 

‘रिचार्ज शॉफ्ट’चा प्रयोग केले असून, त्याद्वारे पावसाळ्यात ओढ्यातील पाणी शुद्ध करून विहिरींत सोडले जाते. अपारंपरिक ऊर्जा स्तोत्र वाढविण्यासाठी बचत गटांमार्फत २५ कुटुंबांना सौरचुलींसाठी प्रत्येकी तीन हजारांचे कर्ज देण्यात आले. शाळा, अंगणवाडी ‘आयएसओ’ ग्रामपंचायतींमध्ये ‘पीओएस’ मशिनद्वारे कॅशलेस व्यवहार केले जातात. ग्रामपंचायतीच्या कामाही ‘झिरो पेंडन्सी’ आहे. 

लोकसंख्येत महिला पुढे
लोधवड्याची लोकसंख्या दोन हजार ७० असून, त्यात एक हजार ४७ महिला, तर एक हजार २३ पुरुष आहेत. शून्य ते सहा वयोगटात ६० टक्‍के मुलींची संख्या आहे. 
आधारकार्डचे काम १०० टक्‍के पूर्ण आहे. ४१० कुटुंबांपैकी १८९ कुटुंबांनी शोषखड्डे घेतले असून, ते १०० टक्‍के करण्याचा प्रयत्न असल्याचे ग्रामसेवक नरेंद्र जगदाळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com