पाणी नाही, नळातून येते नुसतीच हवा 

पाणी नाही, नळातून येते नुसतीच हवा 

सांगलीतील गावभाग, विश्रामबागसारख्या काही सखल भागात 24 तास पाणीपुरवठा होत आहे. तर शहराच्या मुख्य भागात बहुतांश ठिकाणांसह अनेक उपनगरांत ठणठणाट आहे. काही ठिकाणी सात-आठ दिवस नळातून हवा येते. पाणी आले तरी ते नाममात्र, अशी अवस्था आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनावर त्याचा परिणाम झालेला नाही. शहर वाढेल तशी उपनगरेही वाढत गेली. त्याच प्रमाणात नळ कनेक्‍शनही वाढली. मागणीप्रमाणे कनेक्‍शन दिली. मुख्य पाणीवाहिनीला उपवाहिन्या जोडून होता होईल तितकी कनेक्‍शन देऊन लोकांचे समाधान करण्यात आले. प्रत्येक नळातून योग्य दाबाने पाणी येते का नाही हे पाहायचे कुणी ? हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. सर्वसाधारणपणे महापालिका क्षेत्रात 70 हजारांवर नळांची कनेक्‍शन आहेत. हिराबाग कॉर्नर, माळबंगला येथे जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. त्यातील माळबंगल्याल जलशुद्धीकरण केंद्राचे अतिउच्च दर्जाच्या स्काडा प्रणालीप्रमाणे अत्याधुुनिकीकरण करण्यात आले आहे. कृष्णा नदीकाठी वसलेल्या सांगलीत थेट नदीतून उपसा करून तो जलशुद्धीकरणाद्वारे महापालिका क्षेत्रात पाणी पुरवले जाते. जलशुद्धीकरण आणि उपसा-पंपांचे आधुनिकीकरण करून पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडवण्याची आश्‍वासने अजूनही दिली जात आहेत. मात्र, जुन्या वितरण यंत्रणेबाबत "ब्र' काढला जात नाही. शामरावनगर, त्रिमूर्ती कॉलनी, हनुमाननगर, लक्ष्मी नारायण कॉलनी, अण्णा सत्यगोंडा पाटीलनगर आदी भागासह उपनगरात कृत्रिम टंचाई आहे. जागोजाग केलेली खोदाई आणि तत्सम कारणाने अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा विस्कळित असतो. तांत्रिक दुरुस्तीही केली जाते. प्रामुख्याने 40 वर्षांपूर्वीच्या मुख्य वाहिन्या आहेत त्याच्या आजूबाजूला पाणीपुरवठा सुरळीत असला तरी उपवाहिन्यांद्वारे दिल्या गेलेल्या कनेक्‍शनधारकांना फक्त हवेचीच बिले भरावी लागत आहेत. 

हवेच्या बिलाचा भुर्दंड 

साधारणत: पाणी आले काय, नाही आले काय, 320 रुपयांची पाणीपट्टी नळ कनेक्‍शनधारकाला भरावीच लागते. पाणी येत असेल तर ठीक, परंतु पाणी येतच नसल्यास भुर्दंड नागरिकांना का सोसायचा ? आणि एक युनिट (एक हजार लिटर) ला आठ रुपये आकारली जाते. वास्तविक मुख्य जलवाहिनी आणि उपवाहिन्या ह्या गंजल्याने काही ठिकाणी मीटर नुसतीच फिरतात. पाणी न येता हवाच येते, अशी स्थिती आहे. 

""सध्या 36 एमएलडी पाणी उचलले जाते. त्यात 20 एमएलडीची वाढ करून 56 एमएलडी पाणीपुरवठा तातडीने सुरू करण्यात येणार आहे. याचबरोबर 70 एमएलडी अतिरिक्त पाणी उपसा योजनाही कार्यान्वित करून महापालिका क्षेत्रातील पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी निकाली काढण्याचे नियोजन आहे. एप्रिलअखेर शहरात सगळीकडे योग्य दाबाने आणि सुरळीत पाणीपुरवठा होईल, याबाबत युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत.'' 
- रवींद्र खेबुडकर, आयुक्त, सां. मि. कु. महापालिका. 

काही भागातील व्हॉल्व्ह नादुरुस्त असल्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला ही वस्तुस्थिती आहे. याबाबत दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. नागरिकांना लवकरच सुरळीत आणि अखंडित पाणी पुरवण्याबाबतचे नियोजन सुरू आहे. काही ठिकाणी अडचणी असल्यास त्याही दूर केल्या जातील. 
- एस. एस. सागरे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com