"जलसंपदा' च्या निवृत्त अभियंत्याकडे कोट्यवधीचे घबाड 

"जलसंपदा' च्या निवृत्त अभियंत्याकडे कोट्यवधीचे घबाड 

कोल्हापूर - शासकीय सेवेत असताना बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता व सहसचिव सुरेश लक्ष्मण तथा एस. एल. पाटील (वय 61, रा. हिम्मतबहाद्दर परिसर, ताराबाई पार्क, मूळ कसबा बावडा) यांच्यासह त्यांची पत्नी सौ. विद्या व मुलगा विक्रांत यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर श्री. पाटील यांच्या कोल्हापूरसह कसबा बावडा, राजेंद्रनगर, पुणे येथील घर व फ्लॅटवर लाचलुचपत विभागाने छापे टाकले. आतापर्यंतच्या चौकशीत त्यांच्याकडे ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा 4 कोटी 14 लाख 20 हजार 799 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. ज्ञात उत्पन्नापेक्षा हे प्रमाण 68.11 टक्के आहे. 

श्री. पाटील हे 27 ऑक्‍टोबर 1980 रोजी जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता पदावर रूजू झाले. त्यानंतर पदोन्नतीने ते जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता झाले. 31 मे 2012 रोजी ते सेवानिवृत्त झाले. 32 वर्षांच्या सेवेत त्यांनी कोल्हापूरसह मुंबई, पुणे, सोलापूर, सांगली आदी जिल्ह्यांत विविध पदांवर काम केले. मुंबईत मुख्य अभियंता पदावरून ते निवृत्त झाले. त्यानंतर वर्षभरातच त्यांच्याविरोधात निनावी तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उदय आफळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केला. 

गेल्या तीन वर्षात श्री. पाटील यांनी कोल्हापुरात हिम्मतबहाद्दर परिसर व राजेंद्रनगर परिसरातील सिंचन कॉलनी येथे दोन आलिशान बंगले बांधले आहेत. याशिवाय पुणे व मुंबई येथे आलिशान फ्लॅट आहेत. सांगली, सोलापूर येथे शेतजमीनही खरेदी केली आहे. कसबा बावडा या त्यांच्या मूळ गावीही त्यांनी काही जमिनी खरेदी केल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या विरोधात आज शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस उपअधीक्षक उदय आफळे करत आहेत. 

सकाळी गुन्हा दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस बंदोबस्तात श्री. पाटील यांच्या हिम्मतबहाद्दर परिसरातील बंगल्यासह राजेंद्रनगर, पुणे, मुंबईतील फ्लॅटची झडती घेतली. रात्री उशिरापर्यंत झडतीचे काम सुरू होते. सध्या श्री. पाटील यांचे वास्तव्य कुटुंबासह हिम्मतबहाद्दर परिसरात आहे. ही वास्तूही त्यांनी पाच-सहा वर्षापूर्वी विकत घेतल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पावणेदोन लाख सापडले 

लाचलुचपत विभागाने हिम्मतबहाद्दर परिसरातील श्री. पाटील यांच्या घराच्या घेतलेल्या झडतीत रोख पावणेदोन लाखांची रोकड सापडली. श्री. पाटील स्वतः पत्नी, आई व मुलासह याठिकाणी रहातात. राजेंद्रनगर येथील सिंचन कॉलनीतील बंगला त्यांनी भाड्याने दिला आहे. याशिवाय रोखीने खरेदी केलेले बॉंडही आढळून आले. ही गुंतवणूक काळ्या पैशातून केल्याचा संशय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला असल्याचे श्री. आफळे यांनी सांगितले. 

अशी आहे पाटील यांची मालमत्ता 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत श्री. पाटील यांच्याकडे त्यांच्या मूळ गावी कसबा बावडा येथे चार ठिकाणी शेतजमिनी, कागलमध्ये दोन मिळकती, सोलापूरमध्ये एक घर व शेतजमीन, पुणे व मुंबई येथे दोन आलिशान फ्लॅट, सांगलीत एक फ्लॅट व रिकामा प्लॉट अशी मालमत्ता आढळून आली आहे. 

सहा पथकांमार्फत कारवाई 

आज श्री. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथकांनी त्यांच्या कोल्हापूरसह इतर मालमत्तांच्या ठिकाणी छापा टाकून चौकशी केली. या कारवाईत पाच पोलिस उपअधीक्षक, आठ पोलिस निरीक्षक व 50 पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. 

त्या मॅटिंगखाली दडलंय काय ? 

श्री. पाटील यांच्या हिम्मतबहाद्दर परिसरातील आलिशान बंगल्यावर पोलिसांनी दुपारी छापा टाकला. या वेळी बंगल्याच्या बाहेरील एका भिंतीला लागून असलेल्या लॉप्टवर एक काळी सुटकेस दिसून आली. या सुटकेसवर मॅटिंग टाकण्यात आले होते. पोलिसांना मात्र ही बॅग दिसली नाही. या मॅटिंगखाली दडलंय काय? याची चर्चा सिंचन कॉलनी परिसरात सुरू होती. 

त्या दोन हॉटेल्सची चर्चा 

श्री. पाटील यांनी अलीकडेच भूविकास बॅंकेला लागून असलेली जागा विकत घेऊन त्याठिकाणी आलिशान हॉटेल सुरू केले होते. सध्या हे हॉटेल त्यांनी विकल्याचे समजते. याच हॉटेलपासून काही अंतरावर दुसऱ्या एका आलिशान हॉटेलचे बांधकाम सुरू आहे. यात आणखी एका जलसंपदा विभागातीलच निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याची भागिदारी असल्याचे समजते. हे दुसरे अधिकारी कोण ? याबरोबरच या दोन हॉटेल्सचीही चर्चा कोल्हापुरात होऊ लागली आहे. 

भावजय माजी नगरसेविका 

श्री. पाटील यांचे मूळ गाव कसबा बावडा आहे. त्यांच्याकडे वडिलार्जित मोठी जमीन होती. त्यांच्या भावजय माजी नगरसेविका आहेत तर त्यांचे पती बावड्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. या प्रकाराने बावड्यातही या घराण्याविषयीची चर्चा रंगू लागली. 

चौकशीनंतर अटक-सरदेशपांडे 

श्री. पाटील यांच्याविरोधात 2013 मध्ये निनावी तक्रार आली होती. तेव्हापासून त्यांच्याकडील मालमत्तेची चौकशी सुरू होती. या चौकशीत त्यांच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा 4 कोटी 14 लाख रुपये जादा सापडले. त्यामुळे त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या चौकशीत त्यांच्याकडे कोल्हापूरसह पुणे, मुंबईत फ्लॅट, सोलापूर, कसबा बावडा, सांगली येथे शेतजमीन असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या सर्व घरांची झडती घेण्यात आली. मी स्वतः या प्रकरणाचा तपास करत असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर श्री. पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलांना अटक केली जाईल, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पत्रकारांना दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com