पुनर्भरणातून पाणीटंचाईशी दोन हात करू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

सातारा - सातशे- आठशे लोकांची वस्ती, घरटी बोअरवेल, त्यामुळे टंचाईच्या काळात पाणीपातळी २५० फुटांच्या खाली जाणार नाही, तर आणखी काय होणार... त्यामुळे त्यांना खासगी टॅंकरवर अवलंबून राहावे लागत आहे. हे चित्र पालटण्याचा दृढ निश्‍चय त्यांनी मनाशी केला आहे. ‘आजपर्यंत नुसते उपसत होतो आता ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या माध्यमातून पुनर्भरणाची प्रक्रिया करून पाणीटंचाईशी दोन हात करणार...’ साताऱ्याच्या पश्‍चिम भागातील पांडुरंग सौदीकर ‘सकाळ’ला सांगत होते. त्यांच्याबरोबरच साताऱ्यातील आणखी दोघांनी ‘सकाळ’च्या लेखातून प्रेरणा घेऊन ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करण्याचे ठरविले आहे.

दै. ‘सकाळ’मध्ये ‘कॉफी वुईथ सकाळ’मध्ये पर्यावरण तज्ज्ञांनी पाणीटंचाई आणि त्यावरील उपायांच्या अनुषंगाने चर्चा केली. ‘सकाळ’च्या बुधवारच्या (ता. ३) अंकात ती प्रसिद्ध झाली. त्यातून प्रेरणा घेऊन श्री. सौदीकर यांनी ‘सकाळ’शी संपर्क साधत भावना व्यक्त केल्या. भवानी पेठेत युनियन क्‍लबलगतच्या शिवनेरी अपार्टमेंटमधील रहिवासी व रयत शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूल व्यवस्थापनाने आपल्या इमारतींना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ उपाययोजना करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. 

सातारा शहराच्या पश्‍चिमेला, मोरे व केसकर कॉलनी हा शहराच्या हद्दीवरील भाग आहे. याठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत आहे. मात्र, सुविधांच्या पातळीवर रहिवाशांनाच बऱ्याचशा गोष्टी करून घ्याव्या लागतात. श्री. सौदीकरांसह दोनशे- अडीचशे कुटुंबे या भागात राहतात. रस्त्याकडेच्या मोजक्‍या घरांत ग्रामपंचायतीचे नळ कनेक्‍शन आहेत. बाकी बहुतांश कुटुंबांनी स्वत:च्या बोअरवेल घेतल्या आहेत. उन्हाळ्यात भूगर्भातील पाणीपातळी २५० फुटांपेक्षा खाली जाते आणि बोअरवेल बंद पडतात. श्री. सौदीकर सांगत होते, ‘‘घरी काही दिवसांच्या मुक्कामासाठी पाहुणे येणार असल्याने आजच पाण्याचा टॅंकर मागवला. घरावर दोन साठवण टाक्‍या आहेत. दोन हजार लिटरची आणखी एक टाकी व छोटी मोटार खरेदी केली. पाहुण्यांपुरता चार- पाच दिवसांची पाण्याचा प्रश्‍न मिटला. जूनच्या पावसाची वाट पाहात मोरे व केसकर कॉलनीतील रहिवाशांना कुठूनही पाणी आणून दिवस ढकलावे लागत आहेत.’’

‘पहिली १२५ फूट खोलीची बोअर बंद पडली. दुसरी अडीचे फुटांची असूनही उन्हाळ्यात पाणी मिळत नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंगशिवाय पर्याय नसल्याचे पटले आहे, असेही श्री. सौदीकर यांनी नमूद केले.