महाबळेश्‍वर-पाचगणीवर पाणीटंचाईचे सावट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

वेण्णा लेकमधील पाणीपातळी घटू लागली; प्राधिकरणाकडून उपाययोजना सुरू
भिलार - महाबळेश्‍वर-पाचगणी या दोन्ही गिरिस्थांनाना पाणीपुरवठा करणाऱ्या वेण्णा लेकमधील पाण्याची पातळी झपाट्याने घटत आहे. पाणीपुरवठा करणारे इन्टेक वेल कोरडे पडल्याने पाणीटंचाईची भीती आहे.

भविष्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र, उपलब्ध पाणीसाठा सुरळीत पुरवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

राज्यात सर्वांत जास्त पाऊस हा पाचगणी व महाबळेश्‍वरात पडत असला तरी अलीकडच्या काळात प्रत्येक उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. वेण्णा धरणात ५६ दशलक्ष घनफूट पाणी साठवण्याची क्षमता आहे. सध्या धरणात २८ ते २९ दशलक्ष घनफूट पाण्याची पातळी आहे. धरणातून पाचगणीला रोज २०, तर महाबळेश्‍वरला २५ लाख लिटर पाण्याचा पुरवठा होतो. दोन्ही शहरांना सुरळीत व नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी ‘मजीप्रा’कडून दरवर्षी अगोदरच पाणी कपातीचे नियोजन केले जाते, तरीसुद्धा पाणी पुरत नाही. आता दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्यासह कमी पडणाऱ्या पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. 

प्राधिकरणानेही पाण्याची गळतीही थांबवण्याची गरज आहे. पाचगणीला पाणी येताना पाचगणी- महाबळेश्‍वरदरम्यान ठिकठिकाणी ‘प्रेशर व्हॉल्व्ह’मधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. त्यातून बरेच पाणी वाया जाते. ती गळती थांबवणे गरजेचे आहे. बऱ्याच ठिकाणी विना मीटर व विविध प्रकाराने पाणी चोरीचे प्रकार सुरू आहेत. त्याकडेही डोळेझाक होऊ नये. प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्‍यांच्या ‘ओव्हरफ्लो’मधून वाया जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. 

प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांनी पाणी टंचाईची शक्‍यता नाकारली असली तरी वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता पाहता पाणी टंचाईचा सामना दोन्ही शहरांना करावा लागू शकतो.

पाचगणी व महाबळेश्‍वरमधील नागरिकांनी टंचाईच्या काळात पाणी काटकसरीने वापरावे तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा. 
- श्री. गोवंडी, उपभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

महाबळेश्‍वरला रोज सुरळीत पाणीपुरवठा होत असताना पाचगणीला मात्र दिवसाआड पाणी का? हा संशोधनाचा विषय आहे. पाचगणीकरांना सापत्नभावाची वागणूक मिळत आहे. पाचगणीतही समपातळीवर पाणीपुरवठा व्हावा.
- सुनील उंबरकर, ग्राहक, पाचगणी

Web Title: water shortage in mahabaleshwar & pachgani