गावोगावच्या यात्रांवर पाणीटंचाईचे सावट

भद्रेश भाटे 
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

वाई - वाई तालुक्‍यातील १७ गावे व वाड्यावस्त्यांत संभाव्य पाणीटंचाई स्थिती घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये आणखी १७ गावांची भर पडण्याची शक्‍यता आहे. बालेघर येथील अनपटवाडी व कासुर्डेवस्तीला टॅंकर सुरू आहे. गुंडेवाडी व धावडी या दोन गावाचे टॅंकरचे प्रस्ताव आले आहेत. दिवसेंदिवस उष्णता वाढत असून, विहिरीतील पाण्याची पातळी खालावत असल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची भीती आहे. दरम्यान, पूर्व भागातील गावोगावच्या यात्रांवर पाणीटंचाईचे सावट आहे. 

वाई - वाई तालुक्‍यातील १७ गावे व वाड्यावस्त्यांत संभाव्य पाणीटंचाई स्थिती घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये आणखी १७ गावांची भर पडण्याची शक्‍यता आहे. बालेघर येथील अनपटवाडी व कासुर्डेवस्तीला टॅंकर सुरू आहे. गुंडेवाडी व धावडी या दोन गावाचे टॅंकरचे प्रस्ताव आले आहेत. दिवसेंदिवस उष्णता वाढत असून, विहिरीतील पाण्याची पातळी खालावत असल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची भीती आहे. दरम्यान, पूर्व भागातील गावोगावच्या यात्रांवर पाणीटंचाईचे सावट आहे. 

गेल्या वर्षी उन्हाळ्यात १४ गावे व वाड्यावस्त्यांना नऊ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. २०१५- १६ मध्ये तालुक्‍यातील २३ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनांतर्गत पाणीपुरवठा योजनाच्या विहिरीतील व पाझर तलावातील गाळ काढण्याची कामे लोकसहभागातून झाली. गुळुंब- चांदक ओढा जोड हा अंदाजे ८५ लाख रुपये खर्चाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आला. चांदक येथील पाझर तलावाची दुरुस्ती करून गाळ काढण्यात आला. सुमारे ७६ लाख रुपये त्यासाठी खर्च झाले. त्यापूर्वीही तलावाची गळती काढण्यात आली होती. त्यामुळे या वर्षी टंचाईची तीव्रता कमी होईल, असा अंदाज होता. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे गावागावांतील विहिरीतील पाणीपातळी झपाट्याने खालावल्याने अनेक गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल, अशी स्थिती आहे. चांदकचा पाझर तलाव कोरडा पडला असून, गावत टंचाई भासू लागली आहे. तलाव कोरडा पडण्यामागचे नेमके कारण शोधून त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. 

तालुक्‍याच्या पूर्व भागातील अनेक गावांच्या ग्रामदेवतांच्या वार्षिक यात्रांना प्रारंभ झाला आहे. त्यामध्ये गुळुंब, पांडे, खानापूर, चांदक, बोपेगाव, कवठे, केंजळ, पाचवड या गावांचा समावेश आहे. या काळात चाकरमानी व पै- पाहुणे गावाकडे येतात. त्यामुळे या गावांना पाणीटंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात बसणार आहेत.   

संभाव्य पाणीटंचाई विचारात घेऊन प्रशासनाने एप्रिल ते जून अखेरचा टंचाई आराखडा तयार केला आहे. ग्रामसभेचे ठराव घेऊन बालेघर (अनपटवाडी व कासुर्डेवाडी), मोहडेकरवाडी (वळकुंदेवस्ती), आनंदपूर, मुंगसेवाडी, बोपर्डी (धनगरवस्ती, इंदिरानगर), चांदक, गुळूंब, वहागाव, धावडी (वाघमळावस्ती), सुलतानपूर, गुंडेवाडी- पिराचीवाडी, विठ्ठलवाडी, परखंदी, वेळे, मांढरदेव, कवठे व सुरूर (पांडजाईनगर, गोपाळवस्ती, अंबिकानगर, पवारवस्ती) ही १७ गावे टंचाईग्रस्त घोषित केली आहेत. त्याशिवाय गाढवेवाडी, शिरगाव, अभेपुरी, बोपेगाव, वयगाव, पारटवस्ती (जांभळी), चांदवडी पुर्नवसन, बेलमाची, अनवडी, आसरे (आंबेदरावस्ती व बारशेवाडी), नांदगणे, कडेगाव, दहयाट, पांढरेचीवाडी, भिवडी पुनर्वसन, भुईंज (धनगरवाडी), वाघजाईवाडी ही गावे व वाडीवस्त्या टंचाईग्रस्त घोषित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात १६ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागणार असून, त्यासाठी १९ खासगी विहिरी अधिग्रहण करण्याचे सूचविण्यात आले आहे. सध्या डोंगर माथ्यावर असलेल्या बालेघरातील अनपटवाडी व कासुर्डेवाडीतील ९१२ लोकसंख्या व २४० लहान- मोठ्या जनावरांना एका टॅंकरद्वारे दररोज दोन खेपा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी एक विहीर अधिग्रहण करण्यात आली आहे. गुंडेवाडी व धावडी गावांचे टॅंकर मागणीचे प्रस्ताव सादर झाले असून, मांढरदेव, बोपर्डी व चांदक या गावांनी टॅंकरची मागणी केली आहे.

वाढलेल्या लोकसंख्येमुळे अपुरा पाणीपुरवठा
शासनाच्या नियमानुसार २०११ च्या जनगणनेनुसार दरडोई २० लिटर, मोठ्या जनावरांसाठी ४० व लहान जनावरांसाठी १५ लिटर पाणीपुरवठा मंजूर करण्यात येत आहे. त्यामुळे सात वर्षांत वाढलेल्या लोकसंख्येला पाणी कमी पडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासनातील दिरंगाईमुळे टॅंकर वेळेत मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत.