एक दिवसाआड पूर्ण क्षमतेने पाणी द्या

कोल्हापूर - महापालिकेच्या सभेत बोलताना सत्यजित कदम. शेजारी नगरसेवक.
कोल्हापूर - महापालिकेच्या सभेत बोलताना सत्यजित कदम. शेजारी नगरसेवक.

कोल्हापूर - शहरातील ई वॉर्डातील पाणीप्रश्‍न गंभीर बनत आहे. अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने एक दिवसाआड पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करा, अशी मागणी सभेत करण्यात आली. अध्यक्षस्थानी महापौर हसीना फरास होत्या. सदस्यांनी संतप्त भावना सभागृहात मांडल्या. टॅंकर आहे, पण चालक नाही, अशी स्थिती अनेकदा असते. त्याचा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे नगरसेवकांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर दोन दिवसांत हे प्रश्‍न मार्गी लावा, अशा सूचना महापौर हसीना फरास यांनी दिल्या.

शहरातील आणि विशेषत: ई वॉर्डातील पाण्याचा प्रश्‍न आशीष ढवळे, उमा इंगळे, कमलाकर भोपळे आदींसह सदस्यांनी उपस्थित केला. ई वॉर्डात नागरिकांच्या पुन्हा तक्रारी वाढल्या आहेत. अपुरे आणि कमी दाबाने पाणी मिळत आहे, असे सांगून आशीष ढवळे यांनी एक दिवसाआड पाणीपुरवठा केला तर नागरिकांना पुरेसे पाणी मिळते. याला लोकांचीही अनुमती आहे.

त्यामुळे गतवर्षीप्रमाणे याही वर्षी एक दिवसआड पाणीपुरवठा करावा, असे मत मांडले. उमा इंगळे यांनी वारंवार पाण्याचा मुद्दा उपस्थित करूनही पाणीपुरवठा होत नाही. पाणीपुरवठ्यात सुधारणा होत नाही. लोकांचे प्रतिनिधित्व आम्ही करतो. लोकांना आम्हाला उत्तरे द्यावी लागतात.

त्यामुळे आम्ही उपस्थित केलेले प्रश्‍न गांभीर्याने सोडवा, अन्यथा आम्हालाही आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असे मत व्यक्त केले. यावर प्रभारी जलअभियंता सुरेश कुलकर्णी म्हणाले, उन्हाळा असल्याने नदीच्या पाणी पातळीतच घट होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.

यादृष्टीने काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. पाटबंधारे विभागाशी सतत पत्रव्यवहार सुरू आहे. प्रा. जयंत पाटील यांनी नदीतील पाणी संपण्याची वाट पाहू नका, पाणी संपण्यापूर्वीच पत्रव्यवहार सुरू करा, अशी सूचना केली. नगरसेविका रूपाराणी निकम यांनी कचऱ्यापासून बायोगॅस, वीजनिर्मिती सारखे प्रकल्प राबवा, असे सांगितले. तर माधवी लाड यांनी झूम प्रकल्पातील इनहर्ट व कचरा ताबडतोब हलवा, अशी मागणी केली.

काँग्रेसचे सभागृह नेते प्रवीण केसरकर यांनीही टेंबलाईवाडी, विक्रमनगरसह परिसरात सातत्याने पाण्याच्या तक्रारी येत आहेत. आम्ही खासगी टॅंकर आणले तरी मर्यादा पडतात. महापालिकेकडे टॅंकर आहेत; पण चालक नाहीत. अशी उत्तरे अनेकदा ऐकावयास मिळतात. कमलाकर भोपळे यांनीही टेंबलाईवाडी, विक्रमनगरातील पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. दररोज टॅंकर मागवावा लागतो, त्यामुळे हा प्रश्‍न सोडवा, असे मत मांडले. शोभा कवाळे यांनीही प्रशासनाने याबाबतीत ठोस उपाययोजना करावी, अशी भूमिका मांडली. दीपा मगदूम म्हणाल्या, पाण्याच्या टाक्‍या स्वछ करायचे काय झाले. स्थायी समितीनेही यापूर्वी तसा ठराव केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी एका पाण्याच्या टाकीत कबुतर मरून पडल्याचे आढळून आले. प्रशासन झोपा काढत आहे. सगळीकडे नगरसेवकांनीच पहायचे का, असा सवाल केला.

ईपीएफवरून प्रशासन धारेवर
ईपीएफवरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. पीएफ भरण्याच्या अटीमुळे ठेकेदारांनी कामे केलेली नाहीत. त्यामुळे नगरसेवकांचा फंड वाया जाण्याची भीती आहे. यावर तोडगा काढा, असे मत अनुराधा खेडकर, नगरसेवक दिलीप पोवार, शारंगधर देशमुख, जयंत पाटील, सत्यजित कदम यांनी व्यक्त केले. या वेळी शहर अभियंता सरनोबत यांना धारेवर धरले. अतिरिक्त आयुक्त पाटणकर यांना अधिकार असतील तरच त्यांनी आयुक्तांच्या खुर्चीवर बसावे, अन्यथा बसू नये, अशी भूमिका नगरसेवकांनी मांडली. शारंगधर देशमुख यांनी तर आयुक्त पी. शिवशंकर यांच्यावर पळपुटेपणाचा आरोप केला.

क्रीडा विभागाचे काय झाले - सचिन पाटील
महापालिकेचा क्रीडा विभाग अनेक वर्षे बंद आहे. मी सातत्याने हा विभाग सुरू करावा, यासाठी प्रयत्नशील आहे; पण क्रीडा विभाग सुरू झालेला नाही. त्यामुळे याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्‍न उपस्थित करत सचिन पाटील यांनी क्रीडा विभाग सुरू करा, अशी मागणी केली.

महापालिकेच्या खुल्या जागा, गाळे व इमारतीच्या वापरासंदर्भात धोरणात बदल करणेबाबत बोलताना सूरमंजिरी लाटकर यांनी प्रशासन या विषयाचा घोळ घालत आहे. झोपडपट्टीबाबतचा स्वतंत्र प्रस्ताव आणायला हवा. प्रस्ताव क्‍लिष्ट करू नका, असे मत मांडत प्रशासन अभ्यास न करता विनाकारण गोंधळ घालत असल्याचे सांगितले. या वेळी इस्टेट अधिकारी प्रमोद बराले उत्तर देत होते; पण सदस्यांचे समाधान होत नसल्याने उत्तर देण्यासाठी संजय भोसले समोर येत होते; पण शारंगधर देशमुख यांनी त्यांना तेथेच रोखले. तुम्ही थांबा, तुमचा त्या विभागाशी काही संबंध नाही, असे म्हणत त्यांनी भोसले यांना खाली बसायला भाग पाडले. तसेच सरनोबत व संजय भोसले यांचे लाड आता केले जाणार नाहीत, असे स्पष्ट केले.

कत्तलखान्याला विरोधच - भूपाल शेटे 
आयसोलेशन परिसरात कत्तलखान्यासाठी जागा निश्‍चित करून झोन बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत; पण याला आमचा विरोध आहे. महापालिकेला त्यासाठी चार कोटी रुपये भरावे लागणार आहेत. त्याचबरोबर येथे कत्तलखाना झाल्यास नागरी वस्तीला मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. या परिसरात तीस हजार लोकवस्ती आहे. सुभाषनगर, जवाहरनगरसह परिसराला त्रास होणार असल्याने येथे कत्तलखाना सुरू करू नये. त्या वेळी एमआयडीसीत केएमटीची जागा आहे. तेथे हा कत्तलखाना करावा, अशी सूचना भूपाल शेटे यांनी या वेळी केली. किरण नकाते, अश्‍विनी बारामते यांनीही या प्रकल्पाला विरोध असल्याचे स्पष्ट केले. 

आस्थापना विभागावर टीकेची झोड
आस्थापना आणि प्रशासन विभागावरही नगरसेवकांनी टीकेची झोड उठविली. प्रा. जयंत पाटील, तौफिक मुल्लाणी यांनी लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात सापडलेल्या कुंदन लिमकर याच्या कारनाम्याची माहिती प्रशासनाला नव्हती का? तो पहारेकरी असताना त्याला पगार कारकुनाचा चार्ज दिलाच कसा? त्याला लुटीचे लायसन देण्यात कोणाचा हात आहे, असे म्हणत प्रशासनावर टीका केली. रोजंदारी व हंगामी कर्मचाऱ्यांच्या घोटाळ्याचे अनुभव महापालिकेला असताना अशा कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या का देता, असे महेश सावंत यांनी विचारले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com