वडणगे पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - वडणगे (ता. करवीर) येथील पाणीपुरवठा योजनेतून सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब बुधवारी (ता. 26) रात्री कोसळला. दहा दिवसांपासूनच या टाकीच्या टॉपच्या स्लॅबचे काम सुरू आहे.

कोल्हापूर - वडणगे (ता. करवीर) येथील पाणीपुरवठा योजनेतून सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब बुधवारी (ता. 26) रात्री कोसळला. दहा दिवसांपासूनच या टाकीच्या टॉपच्या स्लॅबचे काम सुरू आहे.

काल सायंकाळनंतर स्लॅब टाकण्याचे काम सुरू झाले, मात्र साडेदहाच्या सुमारास स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. सुमारे साडेबारा लाख लिटर क्षमतेची ही टाकी असताना रात्री स्लॅब टाकण्याचे कारण काय, असा संतप्त सवाल उपस्थित करीत आज सकाळपासूनच ग्रामस्थांनी टाकीकडे मोर्चा वळवला. दरम्यान, आज जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नव्याने स्लॅब टाकण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत.

गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून चार वर्षांपूर्वी पाच कोटी रुपयांची नळ-पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे. योजनेचे काम सुरू झाल्यापासून हे काम सतत वादात अडकले आहे. याबाबत वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे तक्रारीही झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्याच देखरेखीखाली हे काम सुरू असून, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा स्लॅब कोसळण्याचा प्रकार घडला. त्यामुळे सुरवातीपासून वादात सुरू झालेल्या या कामाबाबत आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, गावाला सध्या चार दिवसांतून एकदा नळाला पाणी येते. त्यामुळे ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत. त्यातच कामाच्या दर्जाबाबत वारंवार प्रश्‍नचिन्ह निर्माण होत असल्याने या कामाबाबत ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.