आंधळीतून वाळूची नव्‍हे पाण्याची चोरी!

रूपेश कदम
रविवार, 30 एप्रिल 2017

प्रशासनाने धाडी टाकूनही प्रकार सुरूच; गुन्हे दाखल करण्याची गरज

मलवडी - माण तालुक्‍यातील जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आंधळी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अवैध उपसा होत आहे. प्रशासनाकडून वारंवार धाडी टाकूनही निर्ढावलेल्या पाणी चोरांकडून पाणी उपसा सुरूच आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलून या पाणी चोरांवर गुन्हे दाखल करण्याची गरज निर्माण झाली आहे.

माणगंगा नदीवर बोडके गावच्या हद्दीत आंधळी धरण बांधण्यात आले आहे. धरणातील पाण्याचा शेता व पिण्यासाठी उपयोग करण्यात येतो. माणमध्ये पडणाऱ्या सततच्या दुष्काळामुळे कधीतरी हे धरण भरून वाहते. त्यातच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जलसंधारणांच्या कामांमुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. कमी पावसामुळे मागील वर्षी 
२५ टक्केच धरण भरले होते. या धरणातील पाणी अनेक शेतकरी आपल्या शेतीसाठी उचलतात. त्यासाठी काही शेतकऱ्यांनी अधिकृत परवानगी घेतलेली आहे. मात्र, अनेक जण विनापरवानगी पाणी उपसतात. 

सध्या टंचाई परिस्थितीत शेतीसाठी पाणी उपशावर बंदी घालण्यात आली आहे.

खरे तर संभाव्य टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने खूप लवकर कठोर पावले उचलण्याची गरज होती; पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे, तसेच पाणी चोरांच्या विविध क्‍लृप्त्यांमुळे अनिर्बंध पाणी उपसा होतच राहिला. त्याचाच परिणाम म्हणून आता धरणात अत्यल्प पाणी शिल्लक आहे. पाणी उपशाचे प्रमाण, बाष्पीभवन, तसेच पाणी मुरण्याचा वेग पाहता आठवडाभरातच धरण कोरडे ठणठणीत पडण्याची शक्‍यता आहे. धरणातील शासकीय विहिरींमधून दहिवडी, बिदाल, गोंदवले बुद्रुक यासह इतर गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो.

धरणातील पाणी भरणा केंद्रावरून टंचाईग्रस्त गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे; पण पाणीच संपले तर मोठा बिकट प्रसंग उभा राहणार आहे.

 अवैध पाणी उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर काल प्रशासनाच्या पथकाने याठिकाणी धडक कारवाई करून पाच विद्युत मोटारी व एक इंजिन जप्त केले आहे. 

प्रशासनाने एवढ्यावरच न थांबता त्याठिकाणी असलेली विद्युत केबल, तसेच पाइपलाइनसुद्धा जप्त केली, तरच कुठेतरी या प्रकारावर नियंत्रण येईल. अन्यथा पाण्याचा शेवटचा थेंब असेपर्यंत पाणी चोरांकडून अनिर्बंध उपसा सुरूच राहील.

आंधळी धरणातून अवैध पाणी उपशावर बंदी घालण्यात आली आहे. जर पाणी उपसताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच गुन्हे दाखल करण्यात येतील. 
- उत्तम धायगुडे, सहायक अभियंता (श्रेणी एक), सातारा पाटबंधारे विभाग.

Web Title: water theft in andhali