पाणी चोरीप्रकरणी कारवाईची टांगती तलवार

Water-Theft
Water-Theft

सातारा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आर. बी. आंटद हे जेथे भाड्याने राहतात, त्या सोसायटीच्या बिल्डरच्या नावाने प्राधिकरणाने १९ लाख ५९ हजार ४८ रुपयांचे बिल फाडले आहे. येत्या शुक्रवारपर्यंत थकबाकी न भरल्यास पाणी कनेक्‍शन कापण्याची तसेच पाणी चोरीप्रकरणी फौजदारी कारवाईस सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

कोरेगाव रस्त्यावर पुष्कर मंगल कार्यालयासमोर ‘सुंदरा गार्डन’ या गृहप्रकल्पात श्री. आंटद भाड्याने फ्लॅट घेऊन राहतात. सुमारे २०० फ्लॅटची ही स्कीम आहे. या अपार्टमेंटला प्राधिकरणाकडून चार इंची नळकनेक्‍शन घेण्यात आले आहे. श्री. आंटद यांना त्यांच्या नळकनेक्‍शनच्या बिलाबाबत शंका आली. त्यांनी आपल्या कार्यालयात चौकशी केली असता संबंधित कनेक्‍शनला गेल्या काही वर्षांपासून बिलच आकारले जात नसल्याचे उघडकीस आले. बेकायदेशीर नळकनेक्‍शनबाबत श्री. आंटद यांनी कोणताही आडपडदा न ठेवता तत्काळ पाणी कर वसुलीचे आदेश हाताखालच्या प्रशासनास दिले. या प्रकाराबाबत ‘सकाळ’ने ता. २४ एप्रिलच्या अंकात प्रकाश टाकला होता. 

जीवन प्राधिकरणाच्या बॉसच्याच घरात बेकायदा नळकनेक्‍शन निघाल्याने प्राधिकरणातील कारभाराबाबत जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याचबरोबर कार्यकारी अभियंता आर. बी. आंटद यांनी दाखवलेली समयसूचकता व कर्तव्यनिष्ठतेचे कौतुक झाले. विसावा नाक्‍यावरील सुंदरा गार्डनच्या जे. पी. असोसिएट्‌सला अखेर प्राधिकरणाने जानेवारी २०१८ अखेर १९ लाख ५९ हजार ४८ रुपयांचे बिल भरण्यास फर्मावले. मात्र, संबंधितांनी तोंडी आदेशाकडे वेळकाढूपणा करून डोळेझाक केली. प्राधिकरणाने अनेकदा तोंडी सूचना देऊनही संबंधितांनी व्याजासह थकबाकी भरण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे प्राधिकरणाने कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

थकबाकी भरण्याची अंतिम मुदत गुरुवारी (ता. २४) संपत आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी या गृहनिर्माण  प्रकल्पाचा पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यानंतरही थकबाकी भरण्याबाबत सुधारणा न दिल्यास जे. पी. असोसिएट्‌सवर प्राधिकरणाच्या कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार आहेत. प्रसंगी फौजदारी कारवाईला तोंड देण्याची तयारी संबंधितांनी ठेवावी, असा इशाराही प्राधिकरणाने दिला आहे.

तब्बल सव्वातीन लाख व्याज ! 
सुंदरा गार्डनच्या जे. पी. असोसिएट्‌सला जानेवारी २०१८ अखेर १९ लाख ५९ हजार ४८ रुपयांचे बिल भरण्याबाबत प्राधिकरणाने फर्मावले आहे. यात १६ लाख ४६ हजार ५६८ रुपयांचे थकीत पाणी बिल आकारण्यात आले आहे. या थकबाकीवर तीन लाख १२ हजार रुपये व्याज भरावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com