पोलिसच जेव्हा पोलिसांकडून लाच घेतात 

पोलिसच जेव्हा पोलिसांकडून लाच घेतात 

कोल्हापूर - पोलिस लाच कशी घेतात, हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अनेकदा स्पष्ट झाले आहे. पण, पोलिस पोलिसांकडूनही कशी लाच घेतात, हा प्रकार पहिल्यांदाच चव्हाट्यावर आला आहे. काल हा प्रकार चव्हाट्यावर आला असला तरी पोलिसांना सोयीचा बंदोबस्त लावण्यासाठी "खुशीचा सौदा' हा प्रघात काहींनी फार पूर्वीपासूनच पाडूनच ठेवला आहे. कामचुकार पोलिसांना हा सौदा सोयीचा आहे. पण, प्रामाणिक पोलिसांना या खुशीच्या सौद्याचा खूप त्रास आहे. वरिष्ठांविरोधात काही बोलायचे तर शिस्तभंग ठरत आहे. पण, काल आठ पोलिसांनी आपल्या वरिष्ठालाच लाच घेताना पकडून देऊन धारिष्ट्य दाखविले आहे. 

पोलिसांना लाच खायची नव्हे, तर लाच द्यायची सवय ते रिक्रूट असतानाच लागते. रिक्रूट म्हणजे नव्याने भरती झालेला पोलिस. हे पोलिस मुख्यालयात असतात. कायम खाकी चड्डी व बनियनवर असतात. नोकरीच्या पहिल्याच टप्प्यात पोलिस मैदानातील गवत काढण्यापासून ते पोलिसांच्या समारंभात खुर्च्या लावण्यापर्यंत कामे त्यांना लावली जातात. पूर्वी या रिक्रूटना खूप निर्बंधात राहावे लागत असे. आता यातील काही रिक्रूट घरी जाऊन परत कसे येतात? यासाठी ते काय-काय करतात यावर लक्ष ठेवले तर एक साखळीच उघड होणार आहे. 

याशिवाय धरण, पाणवठा क्षेत्रे, रायफल शूटिंग रेंज, एनसीसी ऑफिस, एसआरपी कॅम्प, सीपीआर व ठराविक आरोपींना कोर्टात घेऊन जाण्याची ड्यूटी मिळविणे आवश्‍यक असते. यासाठी त्यांची धडपड असते. आणि या धडपडीतूनच खुशीचा सौदा होतो. ठराविकांनाच ही ड्यूटी मिळते, मग ही ड्यूटी आपल्या सोयीने कशी करायची हे त्या पोलिसांच्याच हातात असते. काही ट्रॅफिक पोलिसांनाही ठराविक ठिकाणीच ड्यूटी मिळते. यामागेही काही कारण दडलेले असते. 

पोलिस दलाचाच एक भाग असलेल्या भारत राखीव बटालियन क्रमांक तीनमध्ये आठ पोलिसांनीच या खदखदीला तोंड फोडले आहे. त्यांनी आपल्या वरिष्ठांनाच लाच घेताना पकडून दिले. हे पोलिस आपल्या खात्याच्या क्रीडा स्पर्धेसाठी जाणार होते. पण, ही सवलत देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली. आणि या पोलिसांच्या धाडसामुळेच पोलिस पोलिसांकडूनच कशी लाच खातात, याची एक साखळी उघड झाली. 

प्रघात मोडला 
ठराविक पोलिसांनाच ठराविक ड्यूटी व इतरांना जनरल ड्यूटी, अशा पोलिस दलात चालू असलेल्या प्रघाताबद्दल काही बोलावे तर तो शिस्तभंग होईल. अशी भीती पोलिसांत आहे. पण, काही पोलिसांनीच आपल्या वरिष्ठांना लाच घेताना पकडून देऊन प्रघात मोडायला नक्की सुरवात केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com