‘फायरमन’ची भरती होणार तरी कधी?

‘फायरमन’ची भरती होणार तरी कधी?

सातारा नगरपालिकेचा गलथान कारभार; वर्षानंतरही ७० उमेदवारांना लेखी परीक्षेची प्रतीक्षा

सातारा - प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे वर्ष उलटले, तरी पालिका प्रशासनाला अग्निशमन विभागात सहा फायमनची भरती करता आली नाही. वर्ष झाले तरी ७० उमेदवार लेखी परीक्षेची वाट पाहात आहेत. एकही फायरमन नसल्याने आगीच्या घटनेवेळी स्थानिक युवकांनाच ‘फायरमन’चे काम करावे लागत आहे. 

साताऱ्यात कोठेही आगीसारखी दुर्घटना घडल्यास पालिकेचा अग्निशमन विभाग धावत- पळत येतो. मात्र, या विभागात काम करणारे कर्मचारी गाडीवरील क्‍लीनर आहेत. अनुभवाच्या जोरावर ते स्वत:चे प्राण धोक्‍यात घालून आग विझविण्याचे काम करतात. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे स्थानिक युवक त्यांच्या मदतीला जातात. बऱ्याच वेळा पालिकेचे हे क्‍लीन गाडीवर ‘ऑपरेटर’चे काम करतात. अग्निशमन पाइपची पुढील गन स्थानिक युवकांच्या हातात असते. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या, ‘अ’ वर्ग नगरपालिकेच्या ठिकाणचे हे चित्र फारसे आशावादी नाही.

शासनाच्या विशेष अनुदानातून साताऱ्यात दोन ठिकाणी अग्निशमन केंद्रे उभारण्यात आली. हुतात्मा चौकातील केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, सदरबझारमधील केंद्र उभारण्याचे काम असलेला कंत्राटदार पळून गेल्याचे सांगण्यात येते. या दोन्ही केंद्रांवर फारयरमन, सुपरवाझर, ऑपरेटर असा सुमारे ६४ जणांचा स्टाफ भरायचा आहे. त्यावरील अस्थापना खर्च न परवडणारा असल्याने तूर्तास ही भरती झालेली नाही. 

पालिकेकडे सुसज्ज दोन टॅंकरसह तीन अग्निशमन वाहने आहेत. या वाहनांवर सहा फायरमनची आवश्‍यकता आहे. त्यांच्या भरतीची जाहिरात गेल्या वर्षी प्रसिद्ध झाली होती. १०० रुपयांच्या डिमांड ड्राफ्टसह सुमारे ७० उमेदवारांनी अर्ज भरले. त्यानंतर मुख्याधिकारी अभिजित बापट यांची बदली झाली. त्यापाठोपाठ पालिका निवडणुका आल्या. त्यामध्ये एक वर्षाचा कालावधी निघून गेला. अद्यापिही भरती होऊ न शकल्याने शहरात कोठेही आग लागल्यास पालिकेच्या बंबाबरोबरच कूपर कारखान्याचा बंब बोलवावा लागतो. हा खर्च अर्थातच बाधित व्यक्तीच्या नावावर पडतो. 

आणखी किती वर्षे वाट पाहावी लागणार?
उमेदवारांच्या अर्जाची छाननी होऊन त्यांची लेखी परीक्षा घेणे गरजेचे आहे. ही परीक्षा घ्यायला वर्ष लागले. मग, त्याचा निकाल लागून प्रत्यक्ष भरती होण्यास आणखी किती वर्षे लागणार असा, या उमेदवारांपुढे प्रश्‍न उभा राहिला आहे. पालिकेचे नूतन पदाधिकारी उत्साही आहेत. काम करून दाखविण्याची त्यांच्यामध्ये उर्मी आहे. याप्रश्‍नी तातडीने लक्ष घालून अग्निशमन दलात फायरमनची भर्ती करावी, अशी जनतेची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com