लाच घेताना सहायक शिक्षण उपनिरीक्षक जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

एचएससी सांकेतिक क्रमांक नूतनीकरण करण्यासाठी फाइल छाननी करून एचएससी बोर्डाकडे पाठविण्यासाठी अर्ज केला होता. प्रस्तावावर शिफारस पत्र देण्यासाठी सुतार यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली.

सोलापूर - शिक्षण संस्थेचे एचएससी सांकेतिक क्रमांक नूतनीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव एचएससी बोर्डाकडे पाठविण्यासाठी सहायक शिक्षण उपनिरीक्षक सूर्यकांत सुतार यांनी अडीच हजारांची लाच स्वीकारली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास जिल्हा परिषदेत सुतार यांना रंगेहाथ पकडले. 

यातील तक्रारदार हे शिक्षण संस्था चालक आहेत. त्यांनी जाणताराजा बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत कनिष्ठ महाविद्यालयाचा एचएससी सांकेतिक क्रमांक नूतनीकरण करण्यासाठी फाइल छाननी करून एचएससी बोर्डाकडे पाठविण्यासाठी अर्ज केला होता. प्रस्तावावर शिफारस पत्र देण्यासाठी सुतार यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. तडजोडीअंती सुतार यांनी दोन हजार पाचशे रुपये लाच मागितली. 

गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेत सापळा लावला. अडीच हजार रुपये स्वीकारताना सूर्यकांत रामचंद्र सुतार (वय 53, आदित्य नगर, विजापूर रोड, सोलापूर) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपायुक्त संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर कार्यालयातील सहायक पोलिस आयुक्त अरुण देवकर यांनी त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: While taking a bribe the Assistant Education Officer was caught