झेडपीच्या कारभाराला वाली कोण?

विष्णू मोहिते
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

सांगली - जिल्हा परिषद विद्यमान सदस्यांची मुदत १९ मार्चला संपते आहे. निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी उद्या (ता. २२) होणारी सर्वसाधारण सभा शेवटची ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वीय निधी खर्चण्यात आलेले अपयश, घोटाळ्यामागून घोटाळ्यांत अडकलेले अधिकारी आणि त्यावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरलेले पदाधिकारी नेहमी चर्चेत राहिले आहेत. पदाधिकारी-अधिकाऱ्यांची दोन चाके परस्पर विरोधी राहिली आहेत. परिणामी कारभाराचा पुरता फज्जा उडाला आहे. यामुळे झेडपीला कोणी वाली आहे का? असा प्रश्‍न वारंवार उपस्थित होत आहे. शेवटच्या सर्वसाधारण सभेत तरी किमान खर्चाचे नियोजन आणि सुरळीत कारभाराची अपेक्षा आहे. 

जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या शेवटच्या वर्षभरातील कारभारावर नजर टाकली तर सर्वसामान्य लोक अनेक प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. मात्र जनतेच्या अपेक्षांना पदाधिकारी अपयशी ठरले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर कारभारात सुधारणा होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यात घसरणच होत आहे. याचा परिणाम येत्या होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत होणार आहे. त्यावेळी वर्षभरातील कारभाराची जबाबदारी कोण घेणार नाही. तत्पूर्वीच राहिलेल्या महिनाभरात चांगली कामे करून पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीस सामोरे जाण्याची तयारीही होत असल्याचे चित्र नाही. गतवर्षीची सुरवात आरोग्य सेवक भरतीतील पेपरफुटी प्रकरणाने झाली. त्यानंतर स्प्रेपंप, चाफकटर, शिलाई मशीन, सायकल खरेदीची प्रक्रिया नियम डावलून झाल्याने प्रकरणे सतत चर्चेत राहिली आहेत. 

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांत तर शिक्षण विभाग नेहमीच घायाळ झाल्याचे चित्र आहे. अर्थ विभागामध्येही सारेकाही अलबेल असल्याचे वातावरण नाही. विविध खरेदीकडे कोणाचे लक्ष नाही; शिवाय ठेकेदारांची अंतिम बिले काढतानाचा व्यवहार नेहमी चर्चेत राहिला आहे. 

दृिष्‍टक्षेपात...
पावणेपाच वर्षे संपली, तीन महिन्यांत तरी दाखवा चमक
सभेत निधी खर्चाचे नियोजन अपेक्षित
आचारसंहिता लागण्यापूर्वी कामांचा निपटारा
प्रादेशिक योजना पाणीपट्टी वसुलीचे प्रयत्न 
उत्पन्नवाढीसाठी जाता-जाता काही प्रयत्न
शिल्लक दुष्काळी निधी तरी खर्चा
इमारत भाडे वसुली, अतिक्रमणे हटाओला गती 
मार्चमध्ये तांत्रिक सभा शक्‍य