चूक कोणाची, सजा कोणाला? 

चूक कोणाची, सजा कोणाला? 

कोल्हापूर - या चार दिवसांत चार गव्यांचा मृत्यू झाला. गव्यांच्या हल्ल्यात तिघांचा बळी गेला. दोन्ही घटना वाईट आहेत; पण मानवी हस्तक्षेप आणि वन्यजीवांचा जंगलाबाहेरचा वाढता वावर यामुळे "चूक कोणाची, सजा कोणाला' या मुद्यावर सर्वच घटकांना त्या विचार करायला लावणाऱ्या आहेत. गवे, हत्ती हे पाणी व हिरव्या चाऱ्याच्या आशेने मानवी वस्तीत येणार हे स्पष्ट आहे. या वन्यप्राण्यांकडून शेतीचे, मानवी जीवाचे नुकसान होत असेल तर शेतकरी त्याला पिटाळून लावणार हे देखील स्पष्ट आहे. त्यातून नकळत एका संघर्षाने मूळ धरले आहे. या परिस्थितीत खरी कसोटी जशी वन विभागाची आहे तशी जंगली वस्तीच्या लगत असलेल्या नागरी वस्तीतील जबाबदार घटकांचीही आहे. 

जंगलातला हिरवा चारा कमी झाला आहे का ? जंगलात हिरवा चारा मुबलक असावा म्हणून खरोखरच प्रयत्न केले जातात का ? व जंगलातील पाणवठे जिवंत राहावेत म्हणून केलेला "पाण्यासारखा' खर्च खरोखरच योग्य पद्धतीने झाला आहे का, या सर्वांची तातडीने संयुक्त पाहणी करण्याची गरज आहे. कारण वन्यप्राणी मानवी वस्तीत आले तर त्याला समजावून घ्या, असे वन विभाग, पर्यावरण अभ्यासकांनी म्हणणे त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे. ज्याच्या शेताचे नुकसान होते त्याने या वन्यप्राण्यांना काहीही करून एकदा पिटाळून लावा, असे म्हणणे त्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी बरोबर असल्या तरी काहीतरी चुकते आहे हे स्पष्ट आहे. काय चुकते याची चर्चा न करता त्या त्या घटनेपुरता तात्पुरता मार्ग शोधला जात आहे. 

भुदरगड तालुक्‍यात आकुर्डे येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला; पण या घटनेपूर्वी उत्साही लोकांनी गव्याचा केलेला पाठलाग, गवा सैरावैरा पळत असताना त्याच्यामागे शिट्ट्या मारून केलेला गोंधळ पूर्ण अनावश्‍यक होता. गवा बिथरून दिशा दिसेल तिकडे जिवाच्या आकांताने पळत होता. समोर झाड आहे, झुडूप आहे, की माणूस आहे हे न पाहता शिंगाने उडवून देत होता. त्यातच दोघांचा बळी गेला. या दोघांच्या मृत्यूने त्या कुटुंबांचा आधार गेला. पुढे काही अंतरावर या पळून पळून दमलेल्या गव्याचाही मृत्यू झाला. 

या घटनेनंतर लगेच मृताच्या नातेवाईकांना आठ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा झाली; पण या रकमेने त्या कुटुंबांचे नुकसान कधीही भरून येणार नाही. गव्याच्या अशा मृत्यूने वनवैभवाचे झालेले नुकसानही कधी सहज भरून येणार नाही. 

आकुर्डे (ता. भुदरगड) येथील ही घटना केवळ एक निमित्त आहे; पण चंदगड, आजरा, राधानगरी तालुक्‍यांत मिळून आजवर पाच हत्तींचा मृत्यू झाला आहे. त्यांतल्या तीन हत्तींना तर विजेचा धक्का बसला आहे. हा धक्का कसा बसला, की बसवला हे गूढ आहे. चारच दिवसांपूर्वी तीन गवे एकाच शेतात मृतावस्थेत आढळून आले आहेत. विषबाधा आहे का, याची खात्री केली जात आहे. गेल्या महिन्यात राधानगरी तालुक्‍यात एका बिबट्याचा झाडावर टांगलेल्या अवस्थेत सडून मृत्यू झाला आहे. हत्ती, बिबट्या, गवे यांचा मृत्यू ही नक्कीच साधी घटना नाही आणि या वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू ही देखील अजिबात दुर्लक्षित घटना नाही. 

अशावेळी वन विभाग, वन अभ्यासक, पर्यावरणप्रेमी, स्वयंसेवी संघटना यांनी संयुक्तपणे काहीतरी करण्याची गरज आहे. ऑफिसमध्ये, घरात बसून सल्ले देण्यापेक्षा प्रत्यक्ष जंगलात फिरणाऱ्या, परिसराचा अभ्यास असणाऱ्या लोकांचा त्यात सहभाग आवश्‍यक आहे. कारण जंगलातले प्राणी मानवी वस्तीत येणारच हे म्हणणे सोपे आहे; पण मानवी वस्तीत हत्ती, गवे हे वन्यप्राणी आल्यावर डोळ्यांदेखत ज्याच्या शेतीचे नुकसान करतात त्या शेतकऱ्यांच्या भावनेलाही जपणे गरजेचे आहे. कारण ज्याचे जळते त्यालात कळते, अशी एक म्हण आहे. 

ठोस उपायाचीच गरज 
ज्याच्या वावरात हत्ती व गव्यांनी धुडगूस घातला आहे त्याला कोणी पर्यावरणावर व्याख्यान द्यायला लागला तर त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार ठरणार आहे. त्यासाठी ठोस उपायाचीच गरज आहे. या उपायाने एकही वन्यप्राणी कधी जंगलातून बाहेर येणार नाही, असे नक्कीच होणार नाही; पण वन्यप्राणी व माणूस यांच्यातला संघर्ष तरी टोकाला जाणार नाही. 

सौर ऊर्जेवर विद्युत कुंपण हा गव्यांना, हत्तींना रोखण्याचा मार्ग आहे. अशा कुंपणासाठी शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय विचाराधीन आहे. या कुंपणाखाली गवत वाढणार नाही, याची व्यवस्थित खबरदारी घेतली तर हे कुंपण विद्युत प्रवाहित राहते. वन्यप्राण्यांना त्यामुळे शेतात प्रवेश करणे अशक्‍य होते. सद्यःस्थितीत तरी ही उपाययोजना खूप परिणामकारक आहे. 
एम. के. राव  अप्पर प्रधान वनसंरक्षक पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com