दारूचे ‘पार्सल’ थेट तळिरामांच्या हाती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

सर्वत्र चित्र : गल्ली-बोळांतही राजरोस विक्री; उत्पादन शुल्क विभागाचे दररोज छापे

सर्वत्र चित्र : गल्ली-बोळांतही राजरोस विक्री; उत्पादन शुल्क विभागाचे दररोज छापे
सांगली - राज्य व राष्ट्रीय महामार्गावर पाचशे मीटर अंतरात दारूविक्रीस बंदी केल्यानंतर तळिरामांना थोडाफार त्रास झाला; परंतु दारू विक्रेत्यांनी त्यांचा त्रासच आता दूर केला आहे. दुकानाच्या मागच्या दाराने, चहाच्या टपरीवर, स्वच्छतागृहात कोठेही मागितले, की दारूचे ‘पार्सल’ मिळू लागले आहे. दारू दुकानासाठी महापालिकांकडे राज्यमार्ग वर्ग करू नका म्हणून प्रयत्न सुरू आहेत. रस्ते हस्तांतर होऊ देत किंवा न होऊ देत, याकडे राजरोस दुर्लक्ष करून चोरट्या मार्गाने दारूची विक्री केली जाते. दोन आठवडे जेथे हाऊसफुल्ल गर्दी होती, तेथे गर्दी दिसत नाही; मात्र गल्ली-बोळात कोठेही दारू मिळू लागली आहे.

राज्य व राष्ट्रीय महामार्गावर सहजपणे दारू उपलब्ध झाली तर अपघात होऊ शकतात, हा मुद्दा लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने पाचशे मीटर अंतरात दारूविक्रीस बंदी घातली. त्याप्रमाणे सर्वत्र आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली. जिल्ह्यातही ६२४ दारू दुकाने, परमिट रूम्स, बार, बीअर शॉपी यांना ‘सील’ करण्यात आले, तर १६४ ठिकाणीच दारू विक्री सुरू आहे. ज्यांच्यावर स्थलांतराची वेळ आली, त्यापैकी बऱ्याच जणांनी अंतराचा घोळ घालण्यास सुरवात केली.

सांगली परिसरात दारू विक्रीची ९० ठिकाणे सील केली, तर ३६ दुकाने अंतरापासून दूर राहिली. ३६ ठिकाणी पहिले दोन आठवडे हाऊसफुल्ल गर्दीचे चित्र दिसले; परंतु त्यानंतर छुप्या मार्गाने राजरोस विक्री सुरू झाली. त्यामुळे गर्दी ओसरू लागली. दुचाकीच्या डिकीत, चहाच्या टपरी, पानटपरीवर, हॉटेलात, दुकानात तसेच दारू दुकानांत मागच्या दाराने राजरोस दारू विक्री सुरू आहे. दारू दुकानात बसून पिण्याऐवजी थेट पार्सल हाती मिळत आहे. रांगेत राहण्यापेक्षा चोरट्या मार्गाने पार्सल घेऊन घरी दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

दारू दुकानांची सुपारी घेऊन काही जणांनी महापालिका हद्दीतून जाणारे राज्यमार्ग हस्तांतर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. महापालिकांना हे परवडणारे नसल्यामुळे त्याला विरोध होऊ लागला. हस्तांतर होऊ दे किंवा न होऊ दे याची काळजी न करता अनेकांनी दारूविक्री सुरूच ठेवली. पोलिस, उत्पादन शुल्ककडून दररोज छापे मारले जातात, तरीही चोरीछुपे दारूविक्री सुरू आहे. सध्या यात्रा सुरू आहेत. अनेक गावांच्या यात्रांत दुचाकीच्या डिकीतून दारूची विक्री सुरू आहे. पूर्वी गावात दारूचे एखादे-दुसरे दुकान होते; परंतु बंदीनंतर जादा भावाने दारू विक्री करणारे अनेक अड्डे निर्माण झाले आहेत. पोलिस व उत्पादन शुल्क कोठे-कोठे पळणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

हा न्यायालयाचा अवमान
राज्य व राष्ट्रीय महामार्गावर पाचशे मीटर अंतरात दारूविक्री बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. त्याचे पालन करण्याची जबाबदारी पार पाडली जात नाही. न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाईही होत नाही. त्यामुळे दारू विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे. न्यायालय आदेशाचा राजरोस अवमान होत असताना ठोस कारवाईची गरज आहे.

दारूचे अड्डे वाढले
पाचशे मीटर अंतरातील दारू दुकान, बीअर बार बंद झाल्यानंतर आता बेकायदा देशी, विदेशी दारू विक्री करणारे अनेक जण व्यवसायात उतरले आहेत. त्यांनी विविध ठिकाणी अड्डेच बनवले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात एक-दोन ठिकाणी मिळणारी दारू आता अनेक ठिकाणी मिळू लागली.

Web Title: wine parcle gives to direct