रुग्णालयात पोचण्यापूर्वीच महिलेची सुखरूप प्रसूती 

रुग्णालयात पोचण्यापूर्वीच महिलेची सुखरूप प्रसूती 

कोल्हापूर - रात्री सव्वादोनची वेळ. प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या आणि 108 ऍम्ब्युलन्सला फोन केला; पण प्रसव कळा वाढू लागल्या आणि महिलेची प्रसूती ऍम्ब्युलन्समध्येच करण्याची वेळ आली. ऍम्ब्युलन्सच्या टीमनं हे आव्हान तितक्‍याच ताकदीनं पेललं आणि प्रसूती यशस्वी केली. 

काल रात्री देवकर पाणंद परिसरातून फोन आल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत ऍम्ब्युलन्स सावित्रीबाई फुले रुग्णालयातून निघाली. वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा कदम यांनी अंधारात पत्ता शोधून काढला आणि चालक दिनकर नीळकंठ यांच्या मदतीने संबंधित महिलेला ऍम्ब्युलन्समध्ये घेतले. प्रसूती वेदना तीव्र होताच त्यांनी अद्ययावत डिलीव्हरी कीट बाजूला काढून ठेवले आणि गर्भवतीस ऑक्‍सिजन सुरू करून चालकाला पंचगंगा हॉस्पिटलकडे ऍम्ब्युलन्स नेण्यास सांगितले. थोड्या वेळातच प्रसूती होईल, अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर डॉ. कदम यांनी ऍम्ब्युलन्स रस्त्याकडेला थांबवायला सांगितली. प्रसूती यशस्वी केली आणि नवजात बाळासह संबंधित मातेस सुरक्षितपणे रात्री तीन वाजून सहा मिनिटांनी पंचगंगा हॉस्पिटलमध्ये आणले. 

तत्काळ उपचार शक्‍य 
"बीव्हीजीएमईएमएस'चे कोल्हापूर सर्कलचे झोनल मॅनेजर डॉ. अरुण मोराळे, जिल्हा व्यवस्थापक संग्राम मोरे म्हणाले, ""इतर खासगी वाहनाने संबंधित महिलेला आणण्याचा प्रयत्न झाला असता तर कदाचित गंभीर प्रसंग उद्‌भवला असता. 108 ऍम्ब्युलन्समुळे प्रसूती यशस्वी झाली. गर्भवतीला हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, फॉलोअप तपासणीसाठीही ऍम्ब्युलन्सचा उपयोग होतो. भाजणे, छातीत कळ येणे, अपघाताबरोबरच विषबाधा झाल्यासही ऍम्ब्युलन्सला फोन केल्यास तत्काळ उपचार शक्‍य होतात. या सुविधेचा लोकांनी लाभ घ्यावा.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com