महिला हवालदार लाच घेताना जाळ्यात 

bribe
bribe

इचलकरंजी  - येथील एका महिला हवालदाराला हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज पकडले. नगरपालिका निवडणुकीच्या मतदान केंद्रावरील बंदोबस्तासाठी तिची नियुक्ती करण्यात आली होती. मतदान केंद्रावरच लाच स्वीकारताना ती या विभागाच्या जाळ्यात सापडली. पोलिसांच्या ताब्यात असलेले वाहन सोडण्यासाठी तिने लाच मागितली होती.

सौ. प्रभावती भूपाल सावंत (बक्कल नं. 260, रा. जयसिंगपूर पोलिस लाइन) असे तिचे नाव आहे. शहरात गेल्या दोन महिन्यांत झालेली ही चौथी कारवाई आहे. त्यामुळे शहर पोलिस दलाची नाचक्की झाली आहे. 

महावीर लक्ष्मण मंजाळी (पाटील मळा, वडर गल्ली, शहापूर, ता. हातकणंगले) यांनी केलेल्या तक्रारीवरून सापळा रचण्यात आला होता. मंजाळी हे काल सकाळी दहाच्या सुमारास मोटारसायकलवरून शहरातील शांतिनगरातील सारथी हॉटेलमध्ये गेले होते. त्यांनी आपली मोटारसायकल हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावली होती. थोड्या वेळाने ते हॉटेलमधून बाहेर आले असता पार्किंगमध्ये ती नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ती चोरीस गेली असावी, या शक्‍यतेने ते गावभाग पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद देण्यास गेले. त्यांनी सौ. सावंत हिच्याकडे मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार दिली. तिने तक्रार नोंदवून घेतली. मोटारसायकल मिळाल्यास मोबाइल नंबरवर कळविते, असे तिने सांगितले. तक्रार नोंदविल्यानंतर सात तासांनी ही मोटारसायकल शहरातील काळा ओढ्यानजीक मिळून आली. याची माहिती हवालदार सौ. सावंत हिने मंजाळी यांना दिली. ही मोटारसायकल परत देण्यासाठी तिने त्यांच्याकडे दोन हजारांची लाच मागितली. त्यामुळे मंजाळी यांनी कोल्हापूरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा लावला. याच दरम्यान सौ. सावंत हिची नगरपालिका निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी शहरातील सांगली रोडवरील तात्यासाहेब मुसळे विद्यालयातील मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली. तिने मंजाळी यांना मतदान केंद्रावरच बोलावून घेतले. त्यांच्यातील चर्चेत दोन हजारांची रक्कम हजारावर आली. हे हजार रुपये घेताना तिला पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस उपाधीक्षक उदय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक पद्मा कदम, पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, सहायक फौजदार श्‍याम बुचडे, हवालदार अमर भोसले, कॉन्स्टेबल मनोज खोत, संदीप पावलेकर, सर्जेराव पाटील, महिला कॉन्स्टेबल अर्पिता चौधरी यांनी केली. 


आयोगाला माहिती देणार 
निवडणूक मतदान केंद्रावरील बंदोबस्तासाठी नियुक्त केलेल्या महिला पोलिस हवालदाराला मतदान केंद्रावरच लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली. या कारवाईचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून येताच त्याची माहिती निवडणूक आयोगाला पाठविणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी आणि इचलकरंजीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी "सकाळ' ला सांगितले. 

इचलकरंजीत चौथी कारवाई 

इचलकरंजीत पोलिस ठाण्यातील लाचखोर पोलिस अधिकाऱ्यांना पकडण्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या दोन महिन्यांत चार वेळा कारवाई केली. या कारवाईत शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, नाईक विष्णू शिंदे, गावभाग ठाण्यातील महिला पोलिस वैशाली कांबळे यांना अटक केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com