गरजू महिला अडकल्या खासगी फायनान्सच्या जाळ्यात 

गरजू महिला अडकल्या खासगी फायनान्सच्या जाळ्यात 

कोल्हापूर - घरगुती अडचणीच्या वेळेला सर्वसामान्य व्यक्तीला तातडीने कर्ज मिळेल, अशी सक्षम सुविधा जिल्ह्यात नाही. याचाच गैरफायदा घेत खासगी सावकारीचे मोठे स्वरूप असलेल्या खासगी फायनान्स कंपन्यांचा सुळसुळाट गावोगावी झाला आहे. अवघ्या दोन-तीन कागदपत्रांवर तत्काळ कर्जाची सुविधा असल्याने हजारो महिलांनी गट करून काही हजार ते लाखांची कर्जे घेतली आहेत. असे कर्ज अनेक महिला फेडत आहेत; मात्र कर्ज देण्याइतपत पैसे खासगी फायनान्स कंपन्यांकडून येतात कोठून, अशा फायनान्स कंपन्यांना रिझर्व्ह बॅंकेची परवानगी आहे काय, असे अनेक प्रश्‍न अनुत्तरित असून कोट्यवधीचे कर्जव्यवहार होत आहेत. अशा बेभरवशी कर्जाच्या वसुलीसाठी अनेक महिलांचे संसार वेठीस धरले आहेत. 

सर्वसामान्याने बॅंकेकडे कर्ज मागणी केली, की सलग तीन वर्षे प्राप्तिकर भरला का, दोन जामीनदार आहेत का, तारण काय देणार आहे, अशा प्रश्‍नांची सरबत्ती करीत कर्जदाराला हिणवण्याचा प्रकार बहुतेक बॅंकांच्या शाखाधिकाऱ्यांकडून वर्षानुवर्षे घडला आहे. सर्वसामान्यांशी बॅंक व्यवहार प्राधान्याने जोडा, या रिझर्व्ह बॅंकेच्या सूचनेलाच अपवाद वगळता बहुतेक बॅंकांनी हरताळ फासला. परिणामी जिथे तत्काळ कर्ज मिळते तिथे सर्वसामान्य व्यक्ती कर्ज घेण्याला प्राधान्य देत आहे. त्यातून खासगी फायनान्सकडून सर्वसामान्य व्यक्तींनी कर्जे घेतली आहेत. 

त्यासाठी फायनान्स कंपन्यांनी वापरलेल्या पद्धती थक्क करणारी आहे. गावातील एखादी महिला वीस-पंचवीस गरजू महिलांना संघटित करते. एखाद्या भाड्याच्या खोलीत मीटिंगसाठी बोलविते. मीटिंगसाठी फायनान्स कंपनीचे दोन-तीन प्रतिनिधी येतात. ते आमची अमूक कंपनी कर्जपुरवठा करते. तुम्ही फक्त आधार कार्ड, रेशन कार्ड द्या, तेवढ्यावर तुम्हाला वीस हजार ते तीन लाखांपर्यंत कर्ज देण्यात येईल. त्याची परतफेड तुम्ही आठवड्याला वीस रुपये ते दहा हजार रुपये हप्ता भरून करू शकता, असे सांगण्यात येते. 

गरजू महिला पटकन घरातील कागदपत्रे देऊन कर्ज उचलतात. त्यानंतर आठवड्याला हप्ता सुरू होतो. कर्ज घेतलेल्या सगळ्या महिलांना एका खोलीत मीटिंगला हप्ता घेऊन येण्याची सक्ती केली जाते. एखादी महिला हप्ता घेऊन आली नाही तर त्या हप्त्याच्या वसुलीसाठी उर्वरित सर्व महिला एकत्रपणे जी महिला हप्ता घेऊन आलेली नाही तिच्या घरी जातात. दारात बसून ""कुठूनही पैसे आण; पण हप्ता भर'' असा तगादा लावा, असे सांगण्यात येते. एखाद्या महिलेने काही कारणाने हप्ता भरला नाही तर शेजाऱ्यांदेखत तिला मानहानीकारक बोलले जाते. यातून येणाऱ्या नैराश्‍याने जिल्हाभरात शेकडो महिला होरपळू लागल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com