हलगर्जीपणा टाळा, डोके, मेंदू सांभाळा 

अमृता जोशी
सोमवार, 20 मार्च 2017

कोल्हापूर - शरीर आणि मनाचा तोल सांभाळण्यात किंबहुना माणसाला जिवंत ठेवण्यात मेंदू महत्त्वाचा अवयव आहे. त्याची काळजी घेण्यात अलीकडच्या काळात हलगर्जीपणा वाढता असल्याची बाब विविध अपघातांतून दिसून येत आहे. यात अवघ्या विशी-तिशीतील युवकांना अपघातात मेंदूला होणारी दुखापत गंभीर बाब बनली आहे. 

कोल्हापूर - शरीर आणि मनाचा तोल सांभाळण्यात किंबहुना माणसाला जिवंत ठेवण्यात मेंदू महत्त्वाचा अवयव आहे. त्याची काळजी घेण्यात अलीकडच्या काळात हलगर्जीपणा वाढता असल्याची बाब विविध अपघातांतून दिसून येत आहे. यात अवघ्या विशी-तिशीतील युवकांना अपघातात मेंदूला होणारी दुखापत गंभीर बाब बनली आहे. 

भरधाव वेगाने वाहन चालविण्यापासून ते हाणामाऱ्यांमुळे मेंदूला गंभीर इजा पोचते आहे. तसेच तीव्र स्वरूपाच्या व्यसनाधीनतेही मेंदूवर आघात होत आहेत. अशात शहरातील अत्याधुनिक मेंदू उपचार सेवा उपलब्ध असल्यातरी मेंदूची काळजी स्वतःच घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी दक्ष राहून मेंदूची सुरक्षितता समजून घेण्याला सदैव प्राधान्य आवश्‍यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

जागतिक मेंदू दुखापत दिनाच्या निमित्ताने मेंदू उपचार या अनुषंगाने विविध ज्ज्ज्ञांशी चर्चा केली असता त्यांच्याकडून वरील अपेक्षा व्यक्त झाली. मेंदू दुखापतींची संख्या कमी करणे असाच जागतिक मेंदू दुखापत जागृती दिन साजरा करण्यामागचा हेतू आहे. मेंदूच्या दुखापतीतून गुंतागुंतीचे मानसिक आजारही निर्माण होतात, ते भयावह असू शकतात. 

डोक्‍याला झालेल्या दुखापतीमुळे मध्यवर्ती चेतासंस्थेला, मेंदूला इजा होऊ शकते. वेळेत योग्य उपचार व काळजी न घेतल्यास छोट्याशा अपघातानेही मोठे नुकसान होऊन जीवनातील आरोग्य, सुख-शांती हरवू शकते. 

डोक्‍याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे उपचारांसाठीचा प्रचंड खर्च, पक्षाघात, मृत्यूही होऊ शकतो. अनेक अपघातग्रस्तांमध्ये केवळ हेल्मेट न घालण्याच्या एका चुकीमुळे शरीराचा काही भाग पक्षाघातग्रस्त किंवा संपूर्ण शरीर पक्षाघातग्रस्त झाल्याच्या घटना आहेत. 

डोक्‍यातील कवटीला दुखापत झाली तरच मेंदूला दुखापत होते, असे नाही. कवटी न फुटताही मेंदूला इजा पोचू शकते. तेव्हा कवटी फ्रॅक्‍चर नाही, म्हणजे मेंदूला दुखापत नाही, असा समज करून शांत बसण्यापेक्षा तातडीने मेंदू विकार तज्ज्ञाकडून सल्ला घेणे गरजेचे आहे. 

जगात दरवर्षी होणाऱ्या अपघातातील पाच टक्के लोकांना गंभीर स्वरूपाच्या, अत्यंत क्‍लेशदायक अशा मेंदू दुखापतींना सामोरे जावे लागते. 

मेंदूला होणाऱ्या दुखापतींपैकी सामान्यतः बाइक्‍स, सायकली, मोठ्या वाहनांचे अपघात, वाहन-पादचाऱ्यांच्या अपघातांमुळे 50 टक्के, उंचावरून पडण्या-कोसळण्यामुळे 25 टक्के, विविध हिंसक घटनेवेळी झालेली दुखापत 20 टक्के या तीन कारणांनी होतात. 

घ्यावयाची दक्षता - 
प्रवास करतेवेळी चारचाकी वाहनात सीटबेल्टचा, दुचाकीवर हेल्मेटचा वापर करावा. 
मद्यपान करून वाहन चालवू नये. 
जिन्यावरून चढता-उतरताना कठड्याचा आधार घ्यावा. तसेच प्रकाशाची सोय असावी. दृष्टी कमजोर झालेल्या व्यक्तींची काळजी घ्यावी. 
कामगारांना डोक्‍याची सुरक्षा उपकरणे पुरवावीत. 

उपचारांची सोय 
कोल्हापूरातील सीपीआरमध्ये ट्रामा केअर सेंटर आहे. येथे मोफत मेंदू उपचार सुविधा आहे. याशिवाय पाच स्वयंसेवी संस्थांच्या रुग्णालयात मेंदूवर उपचार होतात. तेथील अल्पदरात निदान व उपचार सुविधा आहे, शहरात 9 मेंदू विकार तज्ज्ञ आहेत. त्यांच्याही खासगी व स्वयंसेवी संस्थाच्या दवाखान्यातून तपासणी व उपचार सेवा मिळतात. 

हेल्मेट न घातल्यामुळे 
"विन्स' हॉस्पिटलतर्फे दिलेल्या माहितीनुसार गेल्या 25 वर्षांच्या मेंदू उपचार सेवेच्या अनुभवातून पुढे आलेली बाब अशी की, पूर्वी पक्षाघात किंवा तत्सम आजार वयाच्या 55 नंतर होत होते. तसेच गेल्या दहा वर्षांत अपघातात 20 ते 35 वयोगटातील तरुणांची संख्या मोठी आहे. अनेकांना 6 महिने ते 6 वर्षे उपचार घ्यावे लागतील, असे लहान-मोठे दुखापत झालेले असते. यात केवळ हेल्मेट नाही किंवा सिट बेल्ट नाही अशा दुर्लक्षातून झालेल्या अपघातातून मेंदूला दुखापत होतात.