हसते हसते, कट जाए रस्ते!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

‘मी शेवटचा कधी बरं मनमोकळं हसलो होतो?’ स्वतःलाच प्रश्‍न विचारून बघा. दररोजच्या कृत्रिम जगण्यात किती गुरफटून गेलोय, याची जाणीव होईल. हसल्यानं आयुष्य वाढतं, असं विज्ञान सांगत... हसण्यानं घरात चैतन्य नांदतं.. तरीही आपण का बरं हसत नाही. जबाबदारी, संकट, प्रश्‍न, काम, समस्या फक्त आपल्याच वाट्याला आल्यात का? अजिबात नाही. जिल्ह्यातील महत्त्वाची पदं सांभाळणारी मंडळी कितीही तणावात असू देत, काही क्षण काढतात अन्‌ मनमोकळं हसून घेतात. आज (रविवार) जागतिक हास्यदिन, त्यानिमित्त जबाबदारीचं भलंमोठं ओझ डोक्‍यावर वाहणारे ‘हसरे चेहरे’ सांगताहेत त्यांचा अनुभव.

मित्रांसोबत गप्पांत नेहमी फुलते हास्य
अनेकदा नकारात्मक गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात. त्यावर नियंत्रण ठेवणे हातात नसते. त्यातून नैराश्‍य येते. कामात उत्साह आणि सातत्य रहात नाही. माणूस ज्यावेळी नाउमेद होतो तेव्हा संत रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे ‘मन करा रे प्रसन्न..सर्व सिद्धीचे कारण’ हा संदेश लक्षात ठेवावा. जीवनात यशस्वी व्हायचे  असेल तर आनंदी रहावे. कोणत्याही परिस्थितीत आनंदी, समाधानी आणि स्थितप्रज्ञ राहा. मी मित्रांसोबत असताना खूप मोकळेपणाने हसतो. काही मित्रांशी मोबाइलवरून बोलताना तणाव दूर होतो अन्‌ आम्ही नव्या-जुन्या गोष्टींवर चर्चा करत हास्यविनोद करत असतो. 
- दत्तात्रय शिंदे, पोलिस अधीक्षक

ॲन्टी चेंबरला हास्यांचे तुषार फुटतात
महसुली सेवेतून महापालिका सेवेत आल्यानंतर विनोदाच्या प्रसंगांना वानवा नाही. विशेषतः महासभेत डायसवर बसून असे विनोदाचे प्रसंग खूप न्याहाळता येतात. अडचण एवढीच की तिथं बसून हसता येत नाही. मात्र सभा आटोपून आम्ही अधिकारी ॲन्टी चेंबरला येतो तेव्हा मात्र हास्यांचे तुषारे फुटतात. अनेक नगरसेवकांच्या वक्‍तृत्वशैलीपासून त्यांच्या  विशिष्ट शब्दांच्या पुनरुक्तीपर्यंतचे अनेक किस्से आमच्यासाठी विनोदाची मेजवानी असतात.  महापालिकेत तणावाचे प्रसंग आले तरी असे प्रसंग निभावून नेतात.
- रवींद्र खेबुडकर, आयुक्त महापालिका

आनंदाचे प्रसंग शेअर करतो..
प्रशासकीय सेवेत हास्याचे प्रसंग कमीच....ताणतणाव हा कामाचाच भाग. तुम्ही चिडता कधी कधी असं विचारलं तर कोणताही अधिकारी दहा गोष्टी लगेच सांगू शकेल. मात्र, हास्याचे प्रसंग येतात तेव्हा मात्र ते पटकन वेचले पाहिजेत. एखादा व्हिजिटर भेटतो..तर हाताखालचा कर्मचारीही हास्याची शिदोरी देतो. मोजके हास्याचे क्षण समरसून अनुभवले पाहिजेत. माझे पती वैभवही शासकीय सेवेत आहेत. सध्या ते औरंगाबादला सहायक आयुक्त आहेत. दररोजच्या जगण्यातील विसंगती विनोद एखाद्या टीपकागदाप्रमाणे ते शोषतात. माझ्याशी शेअर करताना ते स्वतः पुन:र्प्रत्ययाचा आनंद घेतात.
- स्नेहलता कुंभार, सहायक आयुक्त

मी वेळ काढतोच 
हास्य ही मानवाला मिळालेली दैवी देणगी आहे. दु:ख विसरण्याचे सर्वांत मोठे औषध म्हणजे हास्य आहे. मी दररोजच्या धकाधकीच्या कामातून निश्‍चितपणे थोडा वेळ काढून टीव्हीवरील हास्यविनोदाचे कार्यक्रम न चुकता पाहतो.  हल्ली वॉटस्‌अॅपमुळे अनेक हलके फुलके विनोद तळहातावर आले आहेत. 
- सुशील कुंभार (कारागृह अधीक्षक)

दोस्त माझे आनंदवन
मुलं, नातवंडांसोबत गप्पांत गंमतीजमती होतात  माझे दोस्त म्हणजे आनंदवन आहे. दर शनिवारी आम्ही रात्री जेवायला एकत्र जमतो. रात्री साडेबारा, एकपर्यंत धम्माल करतो. डॉ. विलास पाटील, कोमल पाटील, अशोक जाधव, संजय पाटील, अशी त्यांची  नावं. गेली बारा, पंधरा वर्षे हे सुरू आहे. 
- बाळासाहेब रामदुर्ग, प्र. व्यवस्थापकीय संचालक

Web Title: world laughing day