जलस्रोतांचे प्रदूषण चिंताजनक पातळीवर

निखिल पंडितराव
बुधवार, 22 मार्च 2017

कोल्हापूर - राज्यातील नद्या आणि जलस्रोतांच्या प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही स्थिती चिंताजनक असून, त्याचे विपरीत परिणाम आरोग्य आणि पर्यावरणावर होत आहेत. जलप्रदूषण रोखण्यासाठी गावपातळीपासून सामूहिक तसेच वैयक्तिक पातळीवरही विविध उपाययोजना करण्याची गरज आहे.

सरकारी पातळीवर जलस्रोतांचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. यामध्ये अनेक नमुने प्रदूषित असल्याचे वास्तव पुढे येत आहे.

कोल्हापूर - राज्यातील नद्या आणि जलस्रोतांच्या प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही स्थिती चिंताजनक असून, त्याचे विपरीत परिणाम आरोग्य आणि पर्यावरणावर होत आहेत. जलप्रदूषण रोखण्यासाठी गावपातळीपासून सामूहिक तसेच वैयक्तिक पातळीवरही विविध उपाययोजना करण्याची गरज आहे.

सरकारी पातळीवर जलस्रोतांचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. यामध्ये अनेक नमुने प्रदूषित असल्याचे वास्तव पुढे येत आहे.

प्रदूषणाकडे "सोयीस्कर' दुर्लक्ष करत त्याचे प्रमाण कमी दाखविण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर केला जात असला, तरी वास्तव अत्यंत भीषण असल्याचे दिसते. प्रत्येक महिन्याला पाण्याचे नमुने तपासणीसाठी जिल्ह्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. जिल्हा परिषद आणि महापालिकांकडून ठराविक दिवसांनंतर असे नमुने तपासणी पाठवले जातात. यामधील किमान 30 ते 40 टक्के नमुने प्रदूषित असल्याचे निदर्शनाला येत आहे.

दरम्यान, या संदर्भात पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड म्हणाले, 'राज्यातील नद्या आणि पाण्यांचे स्रोत प्रदूषित होण्याची विविध कारणे समोर येत आहेत. सांडपाणी थेट नदीमध्ये मिसळण्यापासून नदीपात्रात टाकलेल्या कचऱ्यापर्यंतचे विविध घटक त्यासाठी कारणीभूत आहेत. जलस्रोतांना वास्तविक जिवापाड जपण्याची गरज आहे. त्या पद्धतीने नियोजन झाले पाहिजे.''

कागदावर छान, वास्तव भीषण
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाणी गुणवत्ता चाचणी अहवाल आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये वैनगंगा (नागपूर), पूर्णा (अमरावती), गोदावरी (औरंगाबाद), गोदावरी (नाशिक), काळू (कल्याण), बोरे (नवी मुंबई), पाताळगंगा (रायगड), भीमा (पुणे) आणि कृष्णा (सांगली) या ठिकाणच्या पाण्याच्या गुणवत्ता तपासणीसाठी नमुने घेऊन त्याचा 2016 मधील अहवाल प्रसिद्ध केला आहे. प्रत्यक्षात या प्रत्येक ठिकाणाचा अभ्यास केल्यास सगळे नमुने हे मानांकनापेक्षा कमी आहेत, असे दिसते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या अहवालानुसार या नद्यांचे पाणी स्वच्छ आहे, प्रदूषित नाही, असा सरकारी कागद सांगतो. प्रत्यक्षात नद्यांचा पाहणी दौरा केल्यास या नद्यांना गटारगंगेचे स्वरूप येऊ लागल्याचे भीषण वास्तव पुढे येते.

जलस्रोत प्रदूषित होण्याची प्रमुख कारणे
- नागरी वस्तीतील सांडपाणी ओढ्यातून थेट नदीत मिसळणे
- औद्योगिक वसाहतींमधील प्रक्रियायुक्त पाणी नदीत मिसळणे
- घनकचरा विल्हेवाटीची सोय नसल्याने कचरा जलस्रोतांत मिसळणे
- शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर
- वाळूचा बेसुमार उपसा
- इतर कारणे (नदीच्या पाण्यात कपडे आणि जनावरे धुणे, सर्व्हिसिंग सेंटर, कत्तलखाने, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन)

प्रदूषित जलस्रोतांमुळे होणारे आजार
- गॅस्ट्रो, कावीळ, मेंदूचे विकार, पोटाचे विकार

अशी तपासू शकता पाणी शुद्धता
- pH (सामू) ः पाण्यातील क्षार
- DO (पाण्यात विरघळलेला प्राणवायू) ः पाण्यातील जीवांवर परिणाम करतो. कमी DO याचा अर्थ पाण्यात प्रदूषित घटकांची वाढ झाली आहे आणि ते सजीवांसाठी घातक आहे. तापमान आणि दिवसाची वेळ याचा DO वर परिणाम होऊ शकतो.
- BOD हा पाण्यात असलेल्या विघटनशील पदार्थांचे सजीवांमार्फत विघटन होण्यासाठी लागणारा प्राणवायू. COD हा पाण्यात असलेल्या प्रदूषकांचे रसायनांमार्फत विघटन होण्यासाठी लागणारा प्राणवायू. COD हा सर्वसामान्यपणे BOD पेक्षा अधिक असतो. तो BOD च्या दोन ते तीनपटदेखील असू शकतो.
- coliforms सूक्ष्मजीव आढळून येणे म्हणजे पाण्यात विष्ठा मिसळली असल्याचे निदर्शक आहेत.