भाजपची 'भेटवस्तू' सांगलीत!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

संजयनगर रिक्षा स्टॉप परिसरात काल काही कुटुंबांना या पर्स मिळाल्या. भाजप कार्यकर्त्यांनी त्या दिल्याचे कुटुंबियांनी सांगितले. त्या पर्संमध्ये काय आहे यावर मात्र त्यांनी कोणतेही भाष्य करण्यात आले नाही.

सांगली - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील मेळाव्यात मतदारांसाठी जाहीर केलेली भेटवस्तू अखेर सांगलीत दाखल झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी काँग्रेस जणांनी मोठा गदारोळ केला होता. त्यावर ही भेटवस्तू म्हणजे दुसरे काही नसून कार्यकर्त्यांना मतदारांच्या घरी जाऊन नमस्कार करतेवेळी देता येईल अशी छोटे पाऊच आहे, असा खुलासा करण्यात आला होता. त्यानुसार निळ्या रंगाची ही पर्स असून त्यावर भारतीय जनता पार्टी व कमळ चिन्हासह हार्दिक शुभेच्छांसह....असा मजकूर आहे. त्यामुळे आता मतदारांना शुभेच्छांसह... या शब्दाच्या पुढील 'अर्था'ची प्रतिक्षा आहे. 

संजयनगर रिक्षा स्टॉप परिसरात काल काही कुटुंबांना या पर्स मिळाल्या. भाजप कार्यकर्त्यांनी त्या दिल्याचे कुटुंबियांनी सांगितले. त्या पर्संमध्ये काय आहे यावर मात्र त्यांनी कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. तथापि महिला बचत गटांच्या माध्यमातून या पर्सचे वाटप करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रात सुमारे सातशेंवर बचत गटांची नोंद आहे. शिवाय सुक्ष्म कर्ज वाटप करणाऱ्या विविध खासगी वित्तीय कंपन्यांचेही दिड हजारांवर महापालिका क्षेत्रात बचत गट असल्याची चर्चा आहे. या गटांच्या माध्यमातून कार्यकर्ते या पर्सचे वाटप करणार आहेत असे सांगण्यात आले. 
या निळ्या रंगाच्या पर्सवर शुभेच्छांसह... असा मजकूर असल्याने नागरिकांमध्ये मोठी अपेक्षा आहे. नेमक्‍या या शुभेच्छांबरोबर काय येणार याकडे त्यांचे लक्ष आले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महापालिकेवर झेंडा फडकवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांचे पक्षशिस्तीप्रमाणे बुथनिहाय नियोजन केले आहे. या नियोजनाचाच भाग म्हणून 'प्रत्येक मतदाराच्या घरी जा. नमस्कार करा. विचारपूस करा' असे त्यांचे सांगणे आहे. लोकांपर्यंत जा आणि जाता जाता सौजन्याचा भाग म्हणून एक पर्स द्या एवढेच त्यांचे कार्यकर्त्यांना सांगणे आहे. त्याबरहुकूम आता कार्यकर्ते घरोघरी जातील तेव्हा नागरिकांच्या नेमक्‍या काय प्रतिक्रिया येतील हे यथावकाश कळेल. 

हार्दिक शुभेच्छांसह आमचा फक्त नमस्कार! 
ही पर्स म्हणजे कार्यकर्ते कुटुंबापर्यंत पोहचले आहेत का याची केवळ ओळख आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सांगली महापालिका क्षेत्रातील तीस हजार महिलांपर्यंत पर्स पोहचवली जाणार असल्याचे वाटप करणाऱ्या कार्यकर्त्याने सांगितले. या पर्सवरील 'हार्दिक शुभेच्छांसह...' या शब्दप्रयोगाबद्दल अधिक कुतूहल आहे. यावर आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, 'बुथनिहाय संपर्क नियोजनाचा हा भाग आहे. आम्ही फक्त शुभेच्छा देणार आहोत...सोबतीला फक्त नमस्कार असेल.'

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Yesterday BJP workers gave purse to some families in sangli