तरुणाच्या त्रासाला कंटाळून मुलीच्या आईची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

सांगली - मुलीचे ठरलेले लग्न दोनवेळा मोडून वारंवार धमकी देणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून मुलीच्या आईने (वय 45, खटाव, ता. पलूस) विष पिऊन सोमवारी आत्महत्या केली. यातील संशयिताचे नाव राहुल पाटील (ऐतवडे खुर्द, ता. वाळवा) असे असल्याचे स्पष्ट झाले. नातेवाइकांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे भिलवडी पोलिसांनी सांगितले. 

या घटनेतील मुलीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर संबंधित महिला आपला मुलगा, मुलीसह खटाव येथे राहत होती. मुलीला शिक्षणासाठी त्यांनी भावाकडे ठेवले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलगी नोकरी करीत होती. काही दिवसांपूर्वी तिचा साखरपुडा झाला होता. संशयित राहुल पाटीलला याची माहिती मिळताच खोटी माहिती पसरवून त्याने तिचे लग्न मोडले. या प्रकारामुळे मुलीचे नातेवाईक चिंतेत होते. राहुलला समजावून सांगूनही तो ऐकत नव्हता. 

राहुलच्या त्रासाला कंटाळून नातेवाइकांनी पोलिस अधीक्षकांकडेही तक्रार केली. त्यानंतर राहुलला बोलावून घेतले. तेथे त्याने पुन्हा असा प्रकार करणार नाही, असे कबूल केले. परंतु आठवड्यापूर्वीच मुलीचे लग्न ठरल्यानंतर त्याने आडकाठी आणून ते मोडले. मुलीची आई आणि ऐतवडे खुर्दमधील त्यांचा भाऊ यांना राहुल वारंवार धमकी देत होता. मुलीच्या आईने काल राहुलला अक्षरशः हात जोडून विनवणी केली, तरीही तो ऐकत नव्हता. अखेर आज पहाटे मुलीच्या आईने विष प्राशन केले. त्यांना तत्काळ सांगलीला सिव्हिलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: young suicide in sangli