तुमचा प्लॉट तुमच्याच नावावर आहे का?

तुमचा प्लॉट तुमच्याच नावावर आहे का?

कोल्हापूर - खूप वर्षांपूर्वी तुम्ही प्लॉट घेऊन ठेवला आहे किंवा तुम्ही बाहेर कोठे तरी आहात आणि निवृत्तीनंतर कोल्हापुरात येऊन घर बांधायचं म्हणून प्लॉटची खरेदी करून ठेवली आहे. एकदा प्लॉट खरेदी केल्यानंतर पुन्हा अनेक वर्षे त्याकडे तुम्ही फिरकलेला नाही, अशी परिस्थिती आहे. 

प्लॉट कोण चोरून कशाला नेतंय, असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. पण होय, तुमचा प्लॉट आहे त्या जागेवर म्हणजेच तुमच्याच नावावर अजून आहे की नाही, हे पाहण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण तुमचा प्लॉट परस्पर विकून टाकणारी एक ताकदवान टोळी कोल्हापूर परिसरात तयार झाली आहे.

टोळीत कागदोपत्री प्लॉट विक्री करणारा कोणीतरी एखादा आरोपी ठरत असला तरीही प्रत्यक्षात हे सगळं घडवून आणणारी पडद्यामागची यंत्रणा मोठी आहे. गुंडगिरीत ‘नावलौकिक’ कमावून त्या भांडवलावर हा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. रोज फुटकळ दादागिरी, फाळकूट करून किरकोळ कमाई करण्यापेक्षा जागा विक्रीचे दोन-तीन व्यवहार करून झटपट लखपती बनण्याचे त्यांचे हे तंत्र आहे आणि गुंडगिरीतून आपण बाहेर पडलोय, हे दाखवण्यासाठीही हा उद्योग त्यांना उपयोगी पडत आहे.

काही दिवसांपूर्वी राजेंद्रनगर येथील प्लॉट विक्री प्रकरण उघड झाले. यात ज्याचा मूळ प्लॉट त्याचेच बनावट आधार कार्ड तयार केले. नाव मूळ मालकाचे; पण छायाचित्र दुसऱ्याचे लावून त्याला कागदोपत्री मालक दाखविले. साधारण जागेची सर्व कागदपत्रे, खरेदीपत्रास स्वतः ‘मालक’ हजर म्हटल्यावर कोणी शंका घेणे लांबच राहिले व खरेदीचे व्यवहार झाले. 

ज्याची मूळ जागा त्याला तर या विक्रीचा पत्ताच नाही. पण आपली जागा परस्पर कोणी तरी विकल्याचे पाहून मूळ मालकाचे धाबे दणाणले व आपण बनावट मालकाकडून जागा खरेदी केल्याचे लक्षात आल्याने खरेदीदार आर्थिक गोत्यात आले. इचलकरंजीजवळ शहापुरातही असेच व्यवहार झाले. अशी एखाद्याची जागा परस्पर विकता येत नाही, तरी असे कसे घडले, हा सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्‍न आहे. 

पण पूर्वीचे काही गुंड या व्यवसायात उतरले आहेत. ज्या वेळी प्लॉट खरेदी व्यवहारात फोटो व थंब इंप्रेशन पद्धती नव्हती तेव्हा फक्त खरेदी करणारा, विक्री करणारा व साक्षीदार यांच्या सहीने व्यवहार (दस्त) होत होता. कोल्हापूर परिसरात तीस-पस्तीस वर्षांपूर्वी प्लॉटचे दर केवळ हजारांच्या पटीत होते, त्या वेळी अनेकांनी असे प्लॉट घेऊन ठेवले आहेत. त्याच्या दस्ताची कॉपी ही टोळी मिळवते. प्लॉट मालक म्हणून बनावट व्यक्तीचे आधार कार्ड तयार केले जाते. जणू काही आपलाच प्लॉट म्हणून गरजूंना प्लॉट दाखवला जातो. दस्त दाखवले जातात. बनावट मालकाला समोर उभे केले जाते. एवढेच काय, रजिस्टर ऑफिसमध्ये बनावट मालकालाच आणले जाते व व्यवहाराची पूर्तता केली जाते.

काही दिवसांनी मूळ जागामालकाला याची कल्पना येते. जागा खरेदी करणाऱ्यालाही आपल्याला फसवले गेले याची कल्पना येते. मग धावपळ सुरू होते.

दबावतंत्र सुरू होते. काहींनी आयुष्यभराची पुंजी जागा खरेदीत घातलेली असते, त्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी होते.

आक्षेपार्ह नोंदी पाहा
ग्रामीण भागात काही शेतकरी तीन महिन्याला नवा सात-बारा काढतात. आपल्या सात-बारावर काही आक्षेपार्ह नोंदी झाल्या असल्यास त्या लगेच लक्षात याव्यात म्हणून ते खबरदारी घेतात. फार पूर्वी प्लॉट घेऊन ठेवलेल्या लोकांनीही अशी खबरदारी घेण्याची, म्हणजे आपला प्लॉट आपल्याच नावावर आहे का? हे पाहायची वेळ आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com