बॅण्ड पथकात भरती होण्यासाठी तरुण करताहेत सराव

परशुराम कोकणे
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

सोलापूर - सिद्धेश्‍वर मंदिर परिसरात तलावाच्या काठी सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास तरुण मुले ट्रॉम्पेट आणि इतर वाद्य वाजविताना दिसल्यास आश्‍चर्य वाटायला नको. ही मुले पोलिस खात्यातील बॅण्ड पथकामध्ये भरती होण्यासाठी सराव करीत आहेत.

सोलापूर - सिद्धेश्‍वर मंदिर परिसरात तलावाच्या काठी सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास तरुण मुले ट्रॉम्पेट आणि इतर वाद्य वाजविताना दिसल्यास आश्‍चर्य वाटायला नको. ही मुले पोलिस खात्यातील बॅण्ड पथकामध्ये भरती होण्यासाठी सराव करीत आहेत.

ट्रॉम्पेट आणि इतर काही वाद्यांचा आवाज मोठा असतो. त्यामुळे त्यांचा सराव घरी करता येत नाही. बॅण्ड पथकात भरती होणाऱ्या उमेदवारांना उंचीची सवलत आहे. उंचीमुळे जर कोणाला पोलिस खात्यात भरती होता येत नसेल तर बॅण्ड पथकाच्या माध्यमातून पोलिस होता येते. सिद्धेश्‍वर तलावाच्या काठी प्रशिक्षक मैनोद्दीन नदाफ, कैलास गायकवाड हे तरुणांकडून वाद्यांचा सराव करून घेत आहेत. इसाक शेख, अमर पवार, मुबीन शेख, बळिराम रोडे, अप्पालाल नदाफ, मंगेश नेहरकर, संगप्पा कोळी आदी तरुण देशभक्तिपर आणि चित्रपट गीतांच्या चालीवर वाद्ये वाजवून सराव करीत आहेत.

पोलिस बॅण्ड पथकातील दोन जागांसाठी पाचशेहून अधिक मुले येतात. वाद्य सादरीकरणासोबतच त्यांची मैदानी आणि लेखी परीक्षाही घेतली जाते. भरतीवेळी परीक्षकांसमोर आपल्याला जे वाद्य वाजवायला येते ते वाजवून दाखवावे लागते. तसेच वाद्यांची नावे सांगता येणे आवश्‍यक आहे.

खाकी वर्दीचे आकर्षण असल्याने आम्ही पोलिस होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. बॅण्ड पथकात सहभागी होऊन देशसेवा करणार आहोत. आम्ही रोज सिद्धेश्‍वर मंदिर परिसरात येऊन सराव करतो.

- अमर पवार, तरुण

वाद्यांचा सूर माहिती होण्यासाठी रोज किमान सहा तासांचा सराव आवश्‍यक आहे. पोलिस बॅण्ड पथकामध्ये पगार तितकाच आहे. राष्ट्रीय उत्सवावेळी बॅण्ड वाजविण्याची संधी या पोलिसांना मिळते.

- इसाक शेख,तरुण

वयाच्या सोळाव्या वर्षांपासून मी लग्न, समारंभात बॅण्ड पथकातील वाद्ये वाजवतोय. गेल्या काही महिन्यांपासून पोलिस भरतीसाठी सराव करणाऱ्या तरुणांकडून वाद्यांचा सराव करून घेतोय.

- कैलास गायकवाड, प्रशिक्षक