सासरे,जावयाकडून औषध विभागाची "तपासणी' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या औषध विभागाला सासरे व जावयांनी अचानक भेट देऊन तपासणी केली. या ठिकाणी त्यांना साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे आढळल्याने त्यांनी या विभागातील काही कर्मचाऱ्यांनाच बदलण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. दरम्यान, सासरे,जावयांची ही तपासणी जिल्हा परिषदेत चर्चेचा विषय बनला आहे. 

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या औषध विभागाला सासरे व जावयांनी अचानक भेट देऊन तपासणी केली. या ठिकाणी त्यांना साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे आढळल्याने त्यांनी या विभागातील काही कर्मचाऱ्यांनाच बदलण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. दरम्यान, सासरे,जावयांची ही तपासणी जिल्हा परिषदेत चर्चेचा विषय बनला आहे. 

आरोग्य विभाग जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाचा विभाग आहे. जिल्ह्यात साथ रोगाचे नियंत्रण ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या कक्षातील एसी काढून नेल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता औषध विभागाकडे आपला मोर्चा वळविला आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रासाठी लागणाऱ्या औषधाची एकत्रित खरेदी केली जाते. खरेदी बहुतांशी राज्य पातळीवरच केली जाते. स्थानिक पातळीवर खरेदीचे अधिकार देखील आहेत, पण परिस्थितीनुसार मिळतात. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासाठी लागणारी औषधे प्रथम जिल्हा परिषदेच्या कागलकर वाड्यामध्ये असणाऱ्या औषध भांडारामध्ये येतात. तेथून त्याचे संपूर्ण जिल्ह्यात वितरण केले जाते. 

जिल्हा परिषदेच्या एका आरोग्य केंद्रास प्रथम सासऱ्यांनी भेट दिली होती. या ठिकाणी एक्‍सपायरी डेट जवळ आलेले औषध मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचे समजते. तेथील कर्मचाऱ्यांना या औषधाबद्दल विचारले असता त्यांनी मुख्यालयाकडून आत्ताच ही औषध आल्याचे सांगितले. त्यामुळे एक्‍सपायरी डेट जवळ आलेली औषधे खरेदी कशी केली जातात? असा सवाल त्यांनी केला. यावर येथील कर्मचाऱ्यांनी त्यांना औषधांची खरेदी मुख्यालयातून केली जाते, असे सांगितले. त्यामुळे कागलकर वाड्यात असणाऱ्या औषध भांडाराला दोन दिवसापूर्वी जिल्हा परिषदेत सासरे व जावयांनी अचानक भेट दिली. सुमारे अर्धा ते पाऊण तास त्यांनी सर्व भांडार तपासले. 

सीईओंकडे तक्रार 
या ठिकाणी काही औषधे अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आली. काही औषधांच्या एक्‍सपायरी डेट पाहिल्या. त्यानंतर तेथूनच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना फोन लावला. औषध विभागात फार गोंधळ आहे. औषधे देखील नीट ठेवली जात नाहीत. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी तत्काळ बदली करण्याच्या सूचना दिल्या. यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.