सभापतींची नावेही बारामतीहूनच - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

सातारा - जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी तालुकानिहाय कोण इच्छुक आहेत, याची माहिती अजित पवार यांनी आमदारांकडून जाणून घेतली. याबाबत माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगूनच पहिल्या सव्वा वर्षांसाठी चार सभापतींची नावे निश्‍चित करण्याचा निर्णय झाला. शनिवारी (ता. 1) सकाळी सभापती निवडीपूर्वी ही नावे बारामतीवरून कळविली जाणार आहेत.

जिल्हा परिषदेतील चार सभापतींची नावे ठरविण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक आज पाडव्याच्या मुहूर्तावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी मुंबईत झाली. या वेळी आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, नरेंद्र पाटील, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर उपस्थित होते.

ज्या आमदार व माजी आमदारांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आग्रही भूमिका घेऊनही त्यांच्या तालुक्‍यात ही पदे मिळाली नाहीत, अशा आमदारांना सभापती निवडीत प्राधान्य देण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली. त्यानुसार आमदारांनी आपापली मते मांडली. सुरवातीला माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटण तालुक्‍याला उपाध्यक्ष देण्याचे निश्‍चित झाले असताना शरद पवारांच्या सूचनेनुसार व शिवेंद्रसिंहराजेंच्या आग्रहास्तव साताऱ्याला उपाध्यक्षपद दिले गेले. त्यामुळे सभापतिपदात पाटण तालुक्‍याला स्थान द्यावे, अशी भूमिका मांडली. त्यानंतर कऱ्हाडचाही विचार व्हावा, असे मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. मानसिंगराव जगदाळेंची बाजू पुन्हा आमदार शशिकांत शिंदेंनी उचलून धरत त्यांना किमान सभापतिपद दिले पाहिजे, असे सांगितले, तर महिला व बालकल्याण सभापतिपद माजी आमदार (कै.) सदाशिवराव पोळ यांच्या घरात देण्याच्या निर्णयावर सर्वमत झाले; पण समाजकल्याण सभापतिपदासाठी विक्रमसिंह पाटणकर, शशिकांत शिंदे व मकरंद पाटील हे आग्रही राहिले; पण अजित पवार यांनी पाच वर्षांत 12 सदस्यांना आपण सभापतिपदावर संधी देऊ शकतो. त्यानुसार पहिल्या सव्वा वर्षासाठीच नावांची निश्‍चिती करणार आहोत, असे सांगितले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत या सर्वांचा खल सुरू होता. आमदार दीपक चव्हाण आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मुंबईच्या बैठकीला गेले नव्हते.

बैठकीबाबत उत्सुकता
आजच्या बैठकीत सभापतिपदांसाठी कोणाची नावे निश्‍चित केली जाणार, याबाबत साताऱ्यातील राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. त्याबाबत काही माहिती मिळते, का याविषयी अनेक जण रात्री उशिरापर्यंत वृत्तपत्रांच्या कार्यालयांत विचारणा करीत होते. काहींनी आमदारांनाही त्याबाबत विचारणा केली. मात्र, नावे अंतिम झाली नसल्याचेच आमदारांकडून सांगण्यात येत होते.

Web Title: zp chairman name select in baramati