सत्ता कुणाची ठरवणार तीन तालुके

सत्ता कुणाची ठरवणार तीन तालुके

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या ६७ जागांपैकी तब्बल २९ जागा तीन तालुक्‍यांत आहेत, त्यामुळे हे तीन तालुकेच जिल्हा परिषदेवर सत्ता कुणाची, हे ठरवणार आहेत. करवीर, हातकणंगलेत प्रत्येकी 
११ तर शिरोळमध्ये ७ जागा आहेत. अध्यक्षपद खुले असले तरी करवीरमधील सर्व गट आरक्षित, तर हातकणंगलेत एकच गट खुला आहे. शिरोळमध्ये दोन गट खुले आहेत. करवीरमधील सर्व जागा आरक्षित झाल्याने नेते मात्र अस्वस्थ आहेत. 

जिल्हा परिषदेच्या ६७ गटांवरील आरक्षण बुधवारी (ता. ५) निश्‍चित झाले. त्यानंतर कोण कोणत्या गटातून लढणार, याची चाचपणी सुरू झाली. सध्या जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे. त्यांना ‘स्वाभिमानी’ची साथ आहे. यात कागल तालुक्‍यातील पाचही सदस्य काँग्रेसचे आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली. त्यात कागलच्या पाच सदस्यांचे नेतृत्व करणाऱ्या मंडलिक गटाने शिवसेनेची साथ धरली. ‘स्वाभिमानी’ राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपसोबत आहे. भुदरगड-राधानगरीत आमदार शिवसेनेचे असल्याने काँग्रेसचे विद्यमान काही सदस्य येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असतील. शिरोळमध्ये स्वाभिमानीसमोर आमदार उल्हास पाटील यांचे आव्हान असेल. 

करवीर व हातकणंगले तालुके काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत. विद्यमान सभागृहात हातकणंगलेतून काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी व जनसुराज्य प्रत्येकी दोन, भाजपचे तीन तर शिवसेनेचा एक सदस्य आहे. शिरोळमधून आठपैकी पाच ‘स्वाभिमानी’चे तर करवीरमधील दोन विधानसभा मतदारसंघातून पाच सदस्य काँग्रेसचे आहेत. करवीरमधील सहापैकी दोन काँग्रेस तर तीन सेना व एक जनसुराज्यचे सदस्य आहेत. या तीन तालुक्‍यांत जास्तीत जास्त जागा कोणाला मिळणार, यावर जिल्हा परिषदेची सत्ता कुणाच्या हातात हे निश्‍चित होणार आहे. 

कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले तालुक्‍यात महाडिक गटाची ताकद काँग्रेसविरोधात असेल. करवीर विधानसभा वगळता इतरत्र महाडिक गटाचा विरोध आमदार सतेज पाटील यांना असेल. 

शाहूवाडीत सरूडकर गट-मानसिंग गायकवाड तर जनसुराज्य व भाजप एकत्र येण्याची शक्‍यता आहे. भुदरगड, राधानगरी, चंदगड व आजरा तालुक्‍यांवर ‘गोकुळ’च्या राजकारणाचा प्रभाव असेल. गडहिंग्लज राष्ट्रवादीचा बालेकिल्ला तर कागलमध्ये मंडलिक गट शिवसेनेसोबत असल्याने या वेळी काँग्रेसला या तालुक्‍यात उमेदवारही सापडणार नाही, अशी स्थिती आहे. पन्हाळा पुन्हा ‘जनसुराज्य’ ताब्यात ठेवणार की शाहूवाडीची आघाडी या तालुक्‍यात होणार, यावर विरोधकांची रणनीती अवलंबून आहे.

इतर तालुक्‍यांत काय होणार?
चंदगड - ‘गोकुळ’मुळे नरसिंगराव पाटील, भरमू पाटील गट काँग्रेस विरोधात
भुदरगड - बजरंग देसाई ‘गोकुळ’च्या राजकारणात, आमदार आबिटकरांमुळे काँग्रेसच्या हातात भगवा
राधानगरी - राष्ट्रवादी व सेना आक्रमक, काँग्रेसला नेतृत्वाचा अभाव
पन्हाळा-शाहूवाडी - जनसुराज्य-कर्णसिंह गट, सरूडकर -मानसिंगराव आघाडीची चर्चा
आजरा - साखर कारखाना निवडणुकीमुळे महाडिकांची भूमिका महत्त्वाची
गगनबावडा - काँग्रेसला संधी, पी. जी. शिंदे भाजपकडे
गडहिंग्लज - राष्ट्रवादी प्रभावी, जनता दलाशी आघाडी शक्‍य
कागल - काँग्रेस अस्तित्वहिन, मंडलिक गटाकडे काँग्रेसची सूत्रे

तालुकानिहाय जागा अशा
करवीर, हातकणंगले - प्रत्येकी ११, शिरोळ - ७, चंदगड, भुदरगड, शाहूवाडी - प्रत्येकी ४, पन्हाळा - ६, कागल, राधानगरी, गडहिंग्लज - प्रत्येकी ५, आजरा- ३, गगनबावडा- २

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com