सातही गट खुले; इच्छुक भले-भले!

सातही गट खुले; इच्छुक भले-भले!

फलटण - तालुक्‍यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार आपापल्या पक्ष व गटनेत्यांच्या कार्यक्रमास सहकारी व समर्थकांसह उपस्थिती लावू लागलेत. त्यातच तालुक्‍यातील सर्व सातही गट खुले असल्यामुळे इच्छुकांची वाढती गर्दी थोपविण्यासाठी पक्षाचे नेते व गटप्रमुखांना कसरत करावी लागणार आहे.

तालुक्‍यातील एकूण सात गटांपैकी तरडगाव, गिरवी व हिंगणगाव गट खुले, तर कोळकी, गुणवरे, विडणी आणि साखरवाडी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे खुले असल्यामुळे फलटणकरांच्या अपेक्षा सकारात्मक असल्याचे चित्र आहे. उमेदवारी कोणाला मिळणार, हे सांगता येत नसले, तरी तालुक्‍यात प्राथमिक स्वरूपात तिरंगी लढत होईल, असे चित्र आहे. २०१२ मधील निवडणुकीत सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसला पाच ठिकाणी, तर काँग्रेसला विडणी व गिरवी गटात यश मिळाले होते. या वेळी ‘राष्ट्रवादी’च्या बरोबरीने काँग्रेसनेही सातही गटांत पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी अन्य पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. 

तालुक्‍यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादींतर्गत रामराजे नाईक-निंबाळकर व संजीवराजे नाईक- निंबाळकर यांच्या विचारांच्या गटाची सत्ता आहे; परंतु नुकत्याच झालेल्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये एकतृतियांश जागा हिंदूराव नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या काँग्रेसने मिळविल्यामुळे काँग्रेसला येत्या निवडणुकीसाठी बळ मिळाल्याचे दिसते. 

तालुक्‍याच्या पूर्व भागात काँग्रेससह राष्ट्रीय समाज पक्षाचीही काही अंशी ताकद आहे, याचाही विचार सत्तारूढ करीत असल्याचे जाणवू लागले आहे. त्यादृष्टीने ‘राष्ट्रवादी’नेही पूर्व भाग आपल्या ताब्यात घेण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, दादाराजे खर्डेकर, शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह पूर्व भागातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या संपर्कात सत्तारूढ गटाचे नेते व कार्यकर्ते दिसतात. 

मागील निवडणुकीत साखरवाडी गटातील निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची ठरली होती. या वेळी हा गट सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने तेथे दोन्ही पक्षांच्या माध्यमातून कोणाला उमेदवारी मिळणार? हे निश्‍चित सांगता येत नाही. हिंगणगाव गट खुला झाल्याने या गटात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. या पार्श्‍वभूमीवर तुल्यबळ लढत देणारे उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादी देणार यात शंका नाही. कारण हिंगणगाव, तरडगाव आणि साखरवाडी गटांत फलटण शुगर वर्क्‍सचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांची राजकीय व सामाजिक ताकद दखल घेण्याइतपत आहे. त्यामुळे सत्तारूढ गटाला योग्य तो उमेदवार द्यावा लागेल. 

राष्ट्रवादी अन्‌ काँग्रेसलाही नाही निवडणूक सोपी
भाजप आणि शिवसेना यांची युती कशी होईल, हे सध्या तरी सांगता येत नाही; पण ग्रामीण भागात भाजपची ताकद मर्यादित स्वरूपाची दिसते. तरीही सह्याद्री कदम यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे काही अंशी बळ मिळाले आहे. त्यादृष्टीने पक्षनेत्यांकडून सध्या चाचपणी सुरू आहे. एकूणच जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक ‘राष्ट्रवादी’लाही नाही सोपी अन्‌ काँग्रेसलाही सहज यश मिळविण्यासारखी नाही, हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com