बागणी, चिकुर्डेचा निकाल; वाळवा, शिराळ्यात हादरे देणार

- संजय थोरात
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

इस्लामपूर - वाळवा तालुक्‍यात बागणी व चिकुर्डे गटातील लढती लक्षवेधी ठरल्या. तालुक्‍याच्या राजकारणावर या निकालांचा परिणाम निश्‍चित होईल. 

इस्लामपूर - वाळवा तालुक्‍यात बागणी व चिकुर्डे गटातील लढती लक्षवेधी ठरल्या. तालुक्‍याच्या राजकारणावर या निकालांचा परिणाम निश्‍चित होईल. 

बागणीत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सुुपुत्र सागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे सुपुत्र वैभव आणि राष्ट्रवादीचे बंडखोर संभाजी कचरे अशी तिरंगी लढत झाली. आरोप-प्रत्यारोपांमुळे ती चर्चेत राहिली. श्री. खोत यांच्यावर घराणेशाही तर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर मतदारांना प्रलोभन दाखवल्याचा आरोप झाला. शिगाव येथे आमदार जयंत पाटील यांनी त्यावेळी ठिय्या आंदोलन केले. खासदार राजू शेट्टींनीही सागर खोतच्या प्रचारासाठी येणार नाही, अशी भूमिका घेतली. या गटात बागणी, शिगाव, काकाचीवाडी, रोझावाडी, मर्दवाडी, मिरजवाडी, कारंदवाडी, कृष्णानगर, फाळकेवाडी, चंदवाडी या वाड्या-वस्त्या आहेत.

प्रचारात चुरस होती. अपक्ष कचरे यांनी सागर खोत यांना १२२ मतांनी मात दिली. वैभव शिंदे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. अन्य अपक्ष व काँग्रेसला प्रभाव दाखवता आला नाही. २५५ जणांनी नकाराधिकार वापरला. कवित्व अजून रंगले आहे. विरोधकांचा आरोप आहे, की आमदार जयंत पाटील यांनीच राष्ट्रवादीचा करेक्‍ट कार्यक्रम केला. 

१९९५ पासून जयंत पाटील व विलासराव शिंदे एकत्र आहेत. आष्टा पालिकेत दोघांची एकत्र सत्ता आहे. संभाजी कचरे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे म्हटले आहे. जयंत पाटील व विलासराव शिंदे गटाचे संबंध भविष्यात कसे राहतील याबद्दल उत्सुकता आहे. बागणीत विकास आघाडीच्या मनीषा गावडे तर कारंदवाडी गणात राष्ट्रवादीचे जनार्दन पाटील विजयी झालेत. राष्ट्रवादीच्या अधिकृत व अनधिकृत उमेदवाराबद्दल तालुक्‍यात चर्चा रंगली. 

चिकुर्डे गटात राष्ट्रवादीने आमदार जयंत पाटील यांचे निष्ठावान सहकारी व राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांचे सुपुत्र संजीव ऊर्फ बाळतात्या पाटील यांना उमेदवारी दिली. पी. आर. पाटील यांनी सुरवातीपासून चिवट प्रचार केला. विरोधात शिवसेनेचे शिराळा संपर्क प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील होते. श्री. पाटील आणि विकास आघाडीदरम्यान एकत्र लढण्याबाबत चर्चेच्या फेऱ्या झाल्या.

अखेरीस चर्चा निष्फळ ठरली. आघाडीने शहाजी पाटील यांना उमेदवारी दिली. चिकुर्डेत कुरळप, चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, देवर्डे, वशी, लाडेगाव, इटकरे गावे आहेत. अभिजित पाटील यांनी चिवट झुंज दिली. चिकुर्डे, देवर्डे, ऐतवडे खुर्द येथे त्यांनी आघाडी घेतली. तर उर्वरित गावात संजीव पाटील यांनी आघाडी घेत ५८४ मतांनी विजय मिळवला. शहाजी पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

अन्य तीन अपक्ष रिंगणात होते. चिकुर्डे गणात काँग्रेसच्या सुप्रिया भोसले, तर कुरळप गणात राष्ट्रवादीचे पांडुरंग तुकाराम पाटील  विजयी झाले. राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचा गड कायम राखण्यात पी. आर. पाटील यांना यश आले. अभिजित पाटील यांची शिराळा विधानसभा मतदारसंघातील वाटचाल काय राहणार याबद्दल उत्सुकता आहे.

Web Title: zp & panchyat committee election result