मातब्बरांमुळे दणाणणार सभागृह

मातब्बरांमुळे दणाणणार सभागृह

सातारा - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे खुले आरक्षण आणि राजकीय प्रतिष्ठेचे २१ गट खुले झाल्याने दुसऱ्या फळीतील मातब्बर आता जिल्हा परिषदेच्या सभागृहात पोचले आहेत. त्यात तीन मावळते सदस्य आणि चार माजी सदस्यांचाही सहभाग आहे. आरक्षणातील फेरबदलांमुळे बहुतेकांचा पत्ता कट झाल्याने तब्बल ५७ नवे चेहरे सभागृहात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीसह विरोधी गटातील मातब्बर चेहरेही विजयी झाल्याने जिल्हा परिषदेचे सभागृह दणाणणार आहे. 

राजकारणाच्या सारीपाटावर अस्तित्व कायम राखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीतही दुसऱ्या फळीतील राजकीय पुढाऱ्यांनी जोरदार प्रयत्न केले. त्यात अनेकांना यश आले, तर काहींना पराभवाला सामोरे जावे लागले. 

माजी उपाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवांजली नाईक-निंबाळकर, दीपक पवार, मावळते अध्यक्ष सुभाष नरळे यांनी निवडणूक लढविली. त्यात तिघांना यश आले तर सुभाष नरळेंना पराभवाला सामोरे जावे लागले.

यापूर्वी सभागृहात ठसा उमठविणारे काँग्रेसचे भीमराव पाटील हे वाठार किरोली गटातून, राष्ट्रवादीचे मानसिंगराव जगदाळे मसूर गटातून, वसंतराव मानकुमरे हे म्हसवे गटातून, तर पूर्वाश्रमी काँग्रेसचे व सध्या राष्ट्रवादीचे सुरेंद्र गुदगे मायणी गटातून पुनश्‍च जिल्हा परिषदेवर आले आहेत. 

मावळत्या १३ सदस्यांचे नातेवाईक या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. त्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव सोनवलकर यांनी पत्नी भावना, सदस्य अनिल देसाई यांनी वहिनी सुवर्णा, हिंगणगाव गटातील सारिका अनपट यांचे पती धैर्यशील, वनवासवाडी गटातून संदीप शिंदे यांच्या पत्नी रेश्‍मा, मायणीच्या शोभना गुदगे यांचे पती सुरेंद्र, मसूरच्या विजयमाला जगदाळे यांचे पती मानसिंगराव, वर्णे गटातील मंगल घोरपडे यांचे पुत्र मनोज घोरपडे आदी नातेवाईक जिल्हा परिषदेत वारसा चालविणार आहेत. 

पाच वर्षांनी बदलणाऱ्या आरक्षणांमुळे बहुतेकांची दांडी गुल केली. त्यामुळे या वेळी तब्बल ५७ नवीन चेहऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सभागृहात संधी मिळाली आहे. त्यामध्ये माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र ॲड. उदयसिंह, राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांचे बंधू रमेश, सातारा पालिकेचे माजी उपाध्यक्ष जयवंत भोसले, प्रदीप विधाते, अपक्ष उदय कबुले, पाटण विकास आघाडीचे विजय पवार, राष्ट्रवादीचे माजी आमदार (कै). सदाशिव पोळ यांच्या स्नुषा भारती व सोनाली, काँग्रेसचे धैर्यशील कदम यांच्या पत्नी सुनीता कदम, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पत्नी ॲड. जिजामाला, सातारा विकास आघाडीच्या अर्चना देशमुख आदी सदस्यांची सभागृहात एन्ट्री होणार आहे. राष्ट्रवादीच्या विरोधातील सदस्यही दमदार असल्याने पाच वर्षे विविध विषयांनी हे सभागृह दणाणार हे निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com